मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात नोंदविण्यात येणारे कमाल आणि किमान तापमान वाढू लागले आहे. कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर, तर किमान तापमानाचा पारा २० अंशांवर येऊन ठेपला आहे. कमाल आणि किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे येथील थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. रात्री पडणारा किंचित गारवा वगळता मुंबईत दिवसभर तापदायक वातावरणाची नोंद होत आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल. मागील आठवड्यापासून कोकणच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. तापमान वाढ पुढील काही दिवस अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.त्यामुळे मुंबईकरांना ऐन फेब्रुवारीत मे महिन्याचा अनुभव मिळणार आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढू शकते.
मुंबईचे तापमान वाढले; पारा २० अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 2:46 AM