Join us

मुंबईच्या तापमानात वाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:47 AM

‘क्यार’, ‘महा’सारखी चक्रीवादळे आता पूर्णत: विरून गेल्यानंतर मुंबईसह लगतच्या परिसरातील हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : ‘क्यार’, ‘महा’सारखी चक्रीवादळे आता पूर्णत: विरून गेल्यानंतर मुंबईसह लगतच्या परिसरातील हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहे. मुंबापुरीवरील ढगाळ हवामानही हटत असून, सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच कोकण क्षेत्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यात बहुतांश ठिकाणांवरील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असली तरी मुंबईचे किमान तापमान मात्र खाली घसरले नसल्याचे चित्र आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण त्रिपुरा व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते.>वातावरणाती बदलामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. उन्हापासून बचावासाठी गॉगल, दुपट्टा यांचा वापर केला जात आहे.१३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी मुंबईसह लगतच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. तर ‘स्कायमेट’कडील माहितीनुसार, रत्नागिरी, डहाणू, राजकोट, भुज आणि द्वारका येथे हा पाऊस पाहण्याची अपेक्षा आहे. मध्य भारतातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. मुंबईत तापमान वाढेल.