मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना-भाजपाचे सूर पुन्हा एकदा जुळून आले आहेत. मात्र भाजपा आता मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याची खिल्ली विरोधकांकडून उडवली जात आहे. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात गुजरातवरून सिंह आणण्यात येणार असल्याची माहिती देत असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अशाच काही प्रश्नांचा सामना करावा लागला. मात्र गुजरातमधील सिंह राणीबागेत आल्यानंतर त्याचे रक्षण मुंबईचा वाघ करणार, असा अप्रत्यक्ष टोला महापौरांनी भाजपाला लगावला.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत येथे विदेशातूनही पक्षी, प्राणी आयात करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड आणि महापौरांनी शुक्रवारी दिली. गुजरातमधील सिंह येथे आणण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी प्रशासनाने दिली. या वेळेस प्रसारमाध्यमांनी शिवसेना-भाजपा युतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. युतीमुळे महापालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्षपदावर भाजपाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता अद्याप यावर काही निर्णय झालेला नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले. सोबतच गुजरातमधील सिंह राणीबागेत आल्यानंतर त्याचे रक्षण मुंबईचा वाघ करणार, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.उद्यानाच्या विस्ताराचे काम सुरूकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मिळालेल्या सूचनेनुसार वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचा प्रकल्प पालिकेने सुरू केले आहे. यामध्ये उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आराखड्यास प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.या परदेशी पाहुण्यांचे स्वागतजग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिंपाझी, लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी आणले जाणार आहेत. त्यांच्यासाठी पिंजरे बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये पक्षिगृह-२ बनविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. मे २०१९मध्ये यावर काम सुरू होणे अपेक्षित असून यावर २०० कोटी रुपये खर्च केला जाईल.देशी पाहुणेही मुंबईतप्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, बिबट्या, तरस, लांडगा, देशी अस्वल, कोल्हा, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर असे प्राणी आणले जातील. पक्षिगृह १ व २, सर्पालयही बनविण्यात येणार आहे. तसेच गांडूळखत प्रकल्प, जुन्या कार्यालयाजवळील उद्यानही विकसित केले जाणार आहे.