मुंबई : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट आखण्याच्या तयारीत असलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर याच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकही अलर्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत प्रजासत्ताक दिनी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात असून संशयास्पद हालचालींकडे एटीएस लक्ष ठेवून आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही घातपात होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून गुप्तचर तपास यंत्रणांसह पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवली आहे. आता पोलिसांच्या मदतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन, सिव्हिल डिफेन्स तैनात आहेत. दिल्लीत इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडियाचा (सीमी) दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीरला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेमुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबईच्या सुरक्षेकडे तपास यंत्रणेचे विशेष लक्ष वेधले आहे.सोहळ्यावर ड्रोनची नजर-अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेतून शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमºयांसोबतच ड्रोन, मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने संशयित व्यक्ती, वस्तू, वाहने यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. दादर, शिवाजी पार्क येथील मुख्य संचलन सोहळ्यावर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलिसांच्या सुट्ट्या रद्द-प्रजासत्ताक दिनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात राहाणार आहेत.
मुंबईत कडेकोट बंदोबस्त! पोलिसांसह एटीएस सज्ज, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 7:03 AM