Join us  

मुंबापुरीचा ‘आवाज’ वाढला...

By admin | Published: January 19, 2016 2:46 AM

दिल्लीसारखी सम-विषम योजना मुंबईतही राबविण्याबाबत राजकारणी, सामाजिक सेवाभावी संस्था आणि नागरिक यांच्यामध्ये मतांतरे आहेत

मुंबई : दिल्लीसारखी सम-विषम योजना मुंबईतही राबविण्याबाबत राजकारणी, सामाजिक सेवाभावी संस्था आणि नागरिक यांच्यामध्ये मतांतरे आहेत. काहींनी सम-विषमला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे; तर काहींनी नकारात्मक. ‘लोकमत’ने सम-विषमचा ऊहापोह केल्यानंतर मुंबईकरांनी ही योजना उचलून धरली आहे. अशाच काहीशा पार्श्वभूमीवर वाहतूक समस्यांमधील वायुप्रदूषणानंतर ध्वनिप्रदूषणाचाही आढावा आम्ही घेतला असून, वाढत्या ध्वनिप्रदूषणाने मुंबईतला ‘आवाज’ वाढल्याचे स्पष्ट चित्र आहे. मुंबई शहरातील मोटारीकरणाचा विचार केला तर शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ती २६ लाख ९५ हजार ४३५वर पोहोचली आहे. आपल्याकडे मोटारींना १७ प्रकारचे भोंगे आहेत. कोणत्या वाहनांना भोंग्याची मर्यादा किती असावी; याचा नियम नाही. वाहनांचे भोंगे हे ८५ डेसिबल किंवा त्याहून अधिक आवाज करतात. ही समस्या केवळ मुंबईत आहे असे नाही; तर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्येही आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये एखादे वाहन सिग्नल लागल्यावर उभे असेल तर त्यामागील वाहने सिग्नल लागला आहे हे माहीत असूनदेखील मोठमोठ्याने भोंगे वाजवून स्वत:सह इतरांना त्रास देतात; शिवाय ज्या मोक्याच्या रस्त्यांवर ‘शांतता क्षेत्र’ असे नमूद असते अशाच ठिकाणी अधिक मोठ्याने भोंगे वाजवून परिसरातील शांतता भंग केली जाते. मुंबईतील ध्वनिप्रदूषण रोखता यावे म्हणून राज्य सरकार, महापालिका आणि प्रदूषण मंडळाने कठोर पावले उचलली पाहिजेत. मात्र होत काहीच नाही ही खंत आहे.- सुमेरा अब्दुल अली अध्यक्ष, आवाज फाउंडेशन