मुंबईचे पाणी शुद्धच, मात्र गळती आणि चोरी करते घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:06 AM2020-12-31T04:06:43+5:302020-12-31T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईला हजार लीटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईला हजार लीटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते. पाणीपुरवठा असलेल्या जलस्रोतांतून दररोज पाणी जवळपास ४०० किलोमीटर्स लांबीच्या जाळ्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते. पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठवले जाते. त्यानंतर २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते. मात्र नेमके हे पाणी वितरित होताना जेथे जलवाहिन्या गळक्या आहेत, फुटलेल्या आहेत तेथून अशुद्ध पाणी या जलवाहिन्यांमध्ये शिरते. परिणामी झोपड्या, चाळी, इमारती अशा बहुतांश वस्त्यांमध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने गळती आणि पाणीचोरीकडे विषेश लक्ष द्यावे, असे म्हणणे जलतज्ज्ञ सातत्याने मांडत आहेत.
मुंबईत गरिबी-श्रीमंतीचा भेद पाण्याच्या वितरणात स्पष्टपणे जाणवतो, अशी टीका पाणी हक्क समिती सातत्याने करत आहे. झोपड्यांत राहत असलेल्या प्रत्येक नागरिकाला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असे स्पष्ट म्हणणे मांडते. मात्र ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाण्यामुळे डायरिया, कॉलरा, काविळ यासारखे साथीचे आजार पसरतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांमध्ये त्वचेचे विकार, खरुज यासारखे आजार आढळतात. वस्त्यांमध्ये पाण्यासाठी रांग लावणे, पाणी भरणे यासारखी जबाबदारी लहान मुले पार पाडतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. पाणी येण्याची वेळ रात्री-अपरात्री असल्याने पुरेशी झोप मिळत नाही. त्यातून मानसिक आजार बळवितात. पाण्याच्या कमतरतेमुळे वाटपावेळी संघर्ष निर्माण होतात. शारीरिक दुखापती होतात. गरीब वस्त्यांमध्ये जलजोडणी घेतल्यानंतर दोन-चार महिने पाणी व्यवस्थित येते. मात्र कालांतराने पाण्याचा दाब कमी होतो; आणि त्यानंतर पाणीच येत नाही. आणि असे असतानासुद्धा पाण्याचे बिल मात्र दाखल होते.
...............................
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक माणसाला आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. पिण्यासाठी व जेवणासाठी कमीत कमी २० लीटर शुद्ध आणि सुरक्षित पाणी प्रत्येक माणसाला मिळणे गरजेचे आहे. प्रत्येकाला पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी मिळणारे पाणी हे सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यात जीवजंतू, घातक रसायने आणि किरणोत्सर्गाचा समावेश नसावा. पिण्यासह घरगुती वापरासाठी असलेल्या पाण्याला असणारा रंग, चव, गंध हा पाणी पित असलेल्या स्वीकारार्ह असावा. पाणी वितरणात भेदभाव नसावा. कामाच्या ठिकाणी, संस्थांमध्ये सुरक्षित आणि स्वीकारार्ह पाणी सहज सुलभ मिळावे. प्रत्यक्षात मुंबईत विदारक स्थिती आहे.
...............................
मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना शुद्ध पाण्याचाच पुरवठा केला जातो. मात्र ठिकठिकाणी होत असलेली गळती आणि पाण्याची चोरी; यामुळे सांडपाणी किंवा अशुद्ध घटक जलवाहिनीत प्रवेश करतात. हे अशुद्ध घटक जलवाहिनीतील पाण्यात मिसळल्याने बहुतांश ठिकाणी अशुद्ध पाणी किंवा गढूळ पाणी येते. परिणामी गळती आणि पाण्याची चोरी रोखल्यास अशुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल.
- जगदीश पाटणकर, जल अभ्यासक
...............................
महापालिकेची पाणीपुरवठा करणारी यंत्रणा १८४५ सालापासून अस्तित्वात आली.
मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेमधील गळतीचे प्रमाण २५ ते ४० टक्के आहे.
८६२ ते १३०० दशलक्ष लीटर पाणी गळतीमुळे वाया जाते.
पाणीपुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार शहरात राहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १५० लीटर पाण्याची गरज आहे.
आज मुंबईतील झोपड्यांमध्ये दर माणसी दररोज ४० लीटरपेक्षाही कमी पाणी पिण्यासह घरगुती वापरासाठी मिळते.
प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन प्रतिव्यक्ती १३० लीटर पाणी पुरविण्याचे धोरण पालिकेचे आहे.
...............................
मुंबई शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटी ३० लाख आहे.
मुंबईची पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लीटर आहे.
प्रत्यक्षात मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
गळती, बेकायदा जोडणी, चोरी, मीटरमधील तफावत इत्यादी कारणांमुळे २५ टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही.
...............................
मुंबईची लोकसंख्या २०११ साली १.२४ कोटी होती.
मुंबईची लोकसंख्या २०२१ पर्यंत १.३० कोटी होईल.
मुंबईची लोकसंख्या २०३१ पर्यंत १.५० कोटी होईल.
...............................
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव
तानसा
मोडकसागर
अप्पर वैतरणा
विहार
तुळशी
भातसा
मध्य वैतरणा
...............................