मुंबईतील पाणीकपात आठवडाभर पुढे ढकलली; ७ ते १३ डिसेंबर या काळात दहा टक्के कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:28 AM2019-12-03T04:28:58+5:302019-12-03T04:30:07+5:30
पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येतात. मात्र, यंदा याच काळात पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीनिमित्त महापालिका पाणीकपात करणार होती. यामुळे मुंबईत येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार असल्याने पाणीकपात पुढे ढकलली असून आता ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत पाणीकपात करण्यात येईल.
पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मंगळवार ३ डिसेंबरपासून संपूर्ण मुंबईत पाणीकपात लागू करण्यात येणार होती. या दुरुस्तीचे काम आठवडाभर चालणार होते. त्यामुळे ९ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना दहा टक्के कमी दाबाने पाणीपुरवठा होणार होता. मात्र ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर पश्चिम येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी उपस्थिती लावणार आहेत.
अनुयायी मुंबईत येण्यास सुरुवातही झाली आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही पाणीकपात पुढे ढकलण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने पालिका प्रशासनाकडे केली होती. ही मागणी मान्य करीत पालिकेने पाणीकपात पुढे ढकलली आहे. त्यानुसार ३ डिसेंबरऐवजी ७ डिसेंबरपासून पाणीकपात सुरू होईल. पुढील आठवडाभर म्हणजे १३ डिसेंबरपर्यंत दहा टक्के पाणीकपात लागू असेल. या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.