उष्णतेमुळे मुंबईचा पाणीसाठा अवघा ३७ टक्के शिल्लक; चिंता वाढली! मोजमापासाठी यंत्रणा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:28 IST2025-03-27T14:27:38+5:302025-03-27T14:28:10+5:30
पावसाळा सुरू होण्यास दोन महिने आहेत.

उष्णतेमुळे मुंबईचा पाणीसाठा अवघा ३७ टक्के शिल्लक; चिंता वाढली! मोजमापासाठी यंत्रणा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्याच्या उष्णतेमुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. सात धरणांत अवघा ३७ टक्के पाणीसाठा उरल्याने मुंबईकरांना पाणीकपातीची चिंता सतावू लागली आहे. मात्र, पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार नसून, राखीव पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने ‘अप्पर वैतरणा’तून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर ‘भातसा’तून एक लाख १३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची मागणी मुंबईसाठी केली आहे.
पावसाळा सुरू होण्यास दोन महिने आहेत. त्यातच सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे सात जलाशयांतील पाणीसाठा आणखी खालावण्याची शक्यता आहे. यापूर्वी जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. त्यावेळी जलशयांतील राखीव साठ्याचा वापर करण्यात आला होता. यंदाही पालिकेने या साठ्याची मागणी केली असली तरी, गरज लागेल तेव्हाच त्याचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली.
मोजमापासाठी यंत्रणा नाही
वातावरणीय बदलांमुळे मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक बदलले आहेच. शिवाय कडक उन्हाळ्यामुळे जलाशयांतील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मात्र, हे बाष्पीभवन किती होत आहे, त्याचे प्रमाण किती आहे, याचे मोजमाप करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या पालिकेकडे उपलब्ध नाही.
२६ मार्च रोजीचा सात जलाशयांतील साठा (दशलक्ष लिटर)
जलाशय | क्षमता | पाणीसाठा २०२३ | २०२४ | २०२५ |
---|---|---|---|---|
अप्पर वैतरणा | २,२७,०४७ | १,२४,७३२ | १,०४,२३२ | १,०६,७१३ |
मोडक सागर | १,२८,९२५ | ४३,३५५ | ३३,००२ | ३०,६१३ |
तानसा | १,४५,०८० | ७२,१८९ | ६५,६०८ | ४३,९५५ |
मध्य वैतरणा | १,९३,५३० | ३०,८१९ | २०,२१५ | ८०,४७४ |
भातसा | ७,१७,०३७ | २,६९,०१३ | २,२३,१२१ | २,६६,२३४ |
विहार | २७,६९८ | १३,२६० | १२,१७३ | १३,३९६ |
तुळशी | ८,०४६ | ४,१११ | ३,८१० | ३,७९८ |
एकूण | १४,४७,३६३ | ५,५७,४७९ | ४,६२,१६० | ५,४५,१८३ |