मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणारे सातही तलाव ९८.५७ टक्के भरले असून मुंबईकरांची पाणी चिंता मिटली आहे. मुंबईत जून महिन्यात सुमार पाऊस झाला, पण त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा मुक्काम राहिल्याने तलावांमधील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबरपर्यंत सातही तलावांमध्ये १४.१२ लाख दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. २०२० आणि २०२१ मध्ये याच दिवशी अनुक्रमे ९५.२८ आणि ९६.९७ टक्के तलाव भरले होते. मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सातही तलावांमध्ये १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाणी जमा व्हावे लागते. पालिका दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा शहरात करते. तसेच १ ऑक्टोबरला तलावांमधील पाणी साठ्यानुसार कपातीचा निर्णय घेतला जातो. भातसा धरणात ९८.८१ आणि अप्पर वैतरणा धरणात १०० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर तानसा, मध्य वैतरणा, तुळशी तलावही ९५ टक्के भरले आहेत. यामुळे नागरिकांना दिवाळीची भेटच मिळालेली आहे.
मुंबईची पाणी चिंता मिटली, सातही तलाव ९८ टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 6:55 AM