मुंबईचे हवामान दिल्लीहूनही खराब
By admin | Published: March 23, 2017 01:50 AM2017-03-23T01:50:52+5:302017-03-23T01:50:52+5:30
मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि बांधकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच, येथील वातावरणात धुलीकण
अक्षय चोरगे / मुंबई
मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि बांधकामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच, येथील वातावरणात धुलीकण मिसळत आहेत. दुसरीकडे मुंबईमधल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न बिकट होत चालला आहे. डम्पिंगच्या आगीचा धूर वातावरणातले प्रदूषण आणखी वाढवत आहे आणि मुंबईमध्ये वाढत चाललेली वाहनांची संख्या यात आणखीच भर घालत आहे. बांधकामे, डम्पिंगची आग आणि वाढती वाहनांची संख्या या घटकांसह उर्वरित घटकही मुंबईचे वातावरण प्रदूषित करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मागील काही महिन्यांमध्ये दिल्ली सर्वाधिक प्रदूषित; अशा आशायाचे वृत्त प्रसारित होत असतानाच, आता मुंबईही दिल्लीच्या रांगेत जाऊन बसली असून, मुंबईचे वातावरण दिल्लीपेक्षाही खराब असल्याची माहिती, ‘सफर’चे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी दिली. ‘जागतिक हवामान दिना’निमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बेग यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
‘सफर’ नेमके काम काय? ते कसे चालते?
- हवेच्या गुणवत्तेचे पुढील तीन दिवसांचे पूर्वानुमान करणे हे सफरचे मुख्य काम आहे. हवेमध्ये होणाऱ्या बदलांवर नजर ठेवणे व त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे सफरचे दुसरे मोठे काम आहे. मुंबई-पुण्यासह दिल्लीमध्ये विविध ठिकाणी मापनयंत्रणा बसविण्यात आली आहे. महासंगणकाच्या सहाय्याने हवेमधील बदलांचा योग्य अभ्यास करून, त्वरित पूर्वानुमान केले जाते. हे पूर्वानुमान जवळपास बरोबर ठरते.
मुंबई शहरामधली सध्याची हवामानाची परिस्थिती काय आहे?
- जेव्हा ऋतुंमध्ये बदल होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम हवेवर होतो. नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरामधल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. हिवाळ्यामध्ये येथील हवा सर्वात खराब असते. उन्हाळ्यामध्ये यात काही बदल होतात, परंतु यंदा तसा फारसा फरक पडला नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरामधल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाले आहेत?
- गेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबईतली हवा दिल्लीपेक्षाही वाईट झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरामधल्या हवेच्या गुणवत्तेत मोठा फरक पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची नीट काळजी घ्यायला हवी. स्वत:ची काळजी घेत असताना, शहरामधल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
हवेची गुणवत्ता ढासळण्यामागचे कारण काय? आणि त्यावर उपाय काय?
वाहनांमधून निघणारा धूर, धूळयुक्त हवा, जैवइंधन (लाकूड जाळून त्यापासून निघणारा धूर), कारखान्यांमधून निघणारा धूर, वीजप्रकल्पांमधून निर्माण होणारे प्रदूषण या पाच प्रमुख कारणांमुळे हवेची गुणत्ता ढासळत चालली आहे. आपण शहरामधली वाहने कमी करायला हवीत. त्यासाठी मुंबईकरांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करणे, कमी अंतरावर जाण्यासाठी वाहनाऐवजी सायकलचा वापर करणे, मोठमोठ्या इमारती बांधणाऱ्या विकासकांनी हवेमध्ये धूळ कमी पसरेल, याची काळजी घ्यायला हवी. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे कारखाने शहरापासून लांब असावेत, याची काळजी घेतली, तर
नक्कीच शहरामधल्या हवेची गुणवत्ता सुधारेल.
हवेची गुणवत्ता ढासळल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?
- आरोग्य बिघडते. सीओपीडी (क्रोनिक अॅब्स्ट्रक्टिव्ह पूलमॉनरी डिसीज-फुप्फुसांचा एक आजार), अस्थमा, हृदयविकार, चक्कर येणे, थकवा येणे यांसारख्या आजारांना आपणाला सामोरे जावे लागते.
सफरचे तंत्रज्ञान लोकोपयोगी कसे ठरेल?
- हवेमधील बदलांबद्दल तीन दिवस अगोदर पूर्वानुमान करणारी ही प्रणाली आहे. याबद्दल ‘सफर’ लोकांमध्ये जनजागृती करणार आहे. त्यासाठी सफरचे संकेतस्थळ आहे. मोबाइल अॅप आहे. १८००१८०१७१७ हा टोल फ्री क्रमांक लोकांच्या सेवेत आहे.
‘सफर’ यंदा ‘जागतिक हवामान दिन’ कसा साजरा करेल?
‘जागतिक हवामान दिन’ लोकांमध्ये जनजागृती करून साजरा केला जाणार आहे. पुण्यामधल्या अनेक शाळा आणि शैक्षणिक संस्थामध्ये सर्वांसाठी खुल्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले आहे.