मुंबई: एका बाजूला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि त्यातले निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत असताना आता मुंबईकरांसमोरील समस्यांमध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील वोकार्ड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि २६ नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं हे रुग्णालय तात्पुरतं सील केलं आहे. याशिवाय हा भाग कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या संसर्गाबद्दलचा अहवाल मागवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशीदेखील केली जाणार आहे. सध्या वोकार्ड रुग्णालय सील करण्यात आलं असून कोणालाही आत किंवा बाहेर सोडलं जात नाहीए. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची दोनवेळा कोरोना चाचणी होणार असून ती निगेटिव्ह असल्यावरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या रुग्णालयात असलेल्या २७० हून अधिक रुग्ण आणि नर्सेसच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाचा ओपीडी आणि आपत्कालीन विभाग बंद करण्यात आला असून रुग्णालयातील कँटिनमधून रुग्ण आणि नर्सेसना जेवण देण्यात येत आहे.एखाद्या भागात अचानक मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास तो भाग कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. संसर्ग वाढू नये याची खबरदारी म्हणून हा भाग सील केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलच्या सूचना केल्या आहेत. केंद्रानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकाच भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्यास तो भाग ४ आठवडे सील केला जातो. या भागातील कोरोनाबाधितांचं प्रमाण शून्यावर आल्यानंतरच लागू असलेले निर्बंध उठवले जातात.
CoronaVirus: तीन डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सेसना कोरोनाची बाधा; संपूर्ण रुग्णालय सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:16 PM