Join us

मुंबईची महिला वाहतूक पोलीस ठरली 'Hero Of Month'; केली जबरदस्त कामगिरी!

By मोरेश्वर येरम | Published: January 05, 2021 4:42 PM

वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून भाग्यश्री जगताप यांचा सन्मान करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुंबईच्या रस्त्यावर ७ लाखांचा गुटखा पकडून देणारी महिला ट्राफिक पोलीस भाग्यश्री जगताप यांचा Hero Of Month पुरस्काराने सन्मानजगताप यांचा कार्याचं वाहतूक पोलीस दलात होतंय कौतुक

मुंबईमुंबईच्या रस्त्यावर विनानंबर प्लेट धावणाऱ्या एका टेम्पोला अडवून तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करणाऱ्या मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत असलेल्या भाग्यश्री जगताप (३०) या वाहतूक विभागाच्या पहिल्या 'हीरो ऑफ द मन्थ' ठरल्या आहेत. 

वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून भाग्यश्री जगताप यांचा सन्मान करण्यात आला आहे. भाग्यश्री जगताप यांना ५ वर्षांची मुलगी असून त्या आपलं घर सांभाळून वाहतूक विभागात नोकरी करतात. 

डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जगताप या मुंबईतील मार्वे रोड येथे वाहतूक नियंत्रण करत होत्या. जगताप याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारच्या जेवणासाठीचा ब्रेक घेतला होता. जगताप यांना यावेळी एक टेम्पो विनानंबर प्लेट असल्याचं आढळलं. त्यांनी तातडीनं टेम्पोसमोर जाऊन चालकाला रोखलं आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला लावण्याचे निर्देश दिले. जगताप यांनी चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्सची विचारणा केली. पण चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. 

"टेम्पो चालकानं नंबर प्लेट तुटल्याचं सांगितलं आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला घेण्यास तो वारंवार नकार देत होता. त्यामुळे मला शंका आली", असं जगताप म्हणाल्या. टेम्पोत काय आहे? अशी विचारणा केली असता टेम्पो चालकानं टेम्पो रिकामी असल्याचं सांगितलं. 

"सिग्नल हिरवा झाल्यानंतर या टेम्पोमुळे रस्त्यात ट्राफिक जाम होत होतं. चालकाशी वाद झाला. त्याला टेम्पो रस्त्याच्या कडेला घेण्यासाठी मी वारंवार सूचना देत होते. अखेर त्यानं टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. टेम्पोच्या मागचा दरवाजा उघडण्यास मी सांगितलं आणि टेम्पोत अनेक गोण्या मला दिसल्या. टेम्पो रिकामी असल्याचं खोटं का सांगितलं असं विचारलं असता टेम्पो चालकानं या गोण्या एका कुरिअर कंपनीच्या असल्याचं तो म्हणाला. पण तो कुरिअर कंपनीचं नाव सांगण्यास असमर्थ ठरला", असं जगताप म्हणाल्या. 

जगताप यांनी तातडीने टेम्पोच्या किल्ल्या स्वत:जवळ घेतल्या आणि टेम्पोत भरलेल्या गोण्याचा तपास करण्यास सुरुवात केली. गोण्या उघडल्या असता त्यात गुटखा असल्याचं दिसलं. चालकानं क्लिनरला तिथंच ठेवून घटनास्थळावरुन पळ ठोकला. 

"चालकासोबतचा क्लिनर देखील तेथून पळ काढेल यासाठी मी स्वत: त्या टेम्पोत जाऊन त्याच्या शेजारी बसले. टेम्पोत बसून मी कंट्रोल रुमला फोन करुन घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर टेम्पो मालवणी पोलीस ठाण्यात नेण्यात आला", असं जगताप यांनी सांगितलं. 

क्लिनरच्या चौकशीनंतर टेम्पोचा चालक शबन खान यालाही अटक करण्यात आली. भाग्यश्री जगताप यांचे पती देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. या कामगिरीमुळे तिला आणखी हुरूप मिळाला असून ती जोमानं काम करत आहे, असं भाग्यश्री यांच्या पतीनं सांगितलं. भाग्यश्री जगताप उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा फोटो देखील मुख्य कार्यालयात लावण्यात आला आहे. 

मुंबई वाहतूक पोलिसांनी दर महिन्याला पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच त्यांना रोखरकमेचंही पारितोषिक देण्यात येत आहे.  

टॅग्स :मुंबई पोलीसवाहतूक पोलीसवाहतूक कोंडीमुंबई