कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मुंबईचे काम परिणामकारक; वॉशिंग्टन पोस्टने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 02:31 PM2020-07-19T14:31:04+5:302020-07-19T14:32:13+5:30

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कोरोना कामगिरीची दखल घेतली आहे.

Mumbai's work in controlling Corona is effective; The Washington Post noted | कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मुंबईचे काम परिणामकारक; वॉशिंग्टन पोस्टने घेतली दखल

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मुंबईचे काम परिणामकारक; वॉशिंग्टन पोस्टने घेतली दखल

Next
ठळक मुद्देचेस द वायरस आणि ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंगची चतु:सूत्री

मुंबई : वरळी, धारावी आणि पश्चिम उपनगरातील कोरोनासह आता मुंबईतल्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला असतानाच अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कोरोना कामगिरीची दखल घेतली आहे. मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण, बरे रुग्ण आणि मृत्यू याबाबतचे आकडे पारदर्शक असून, मुंबई महापालिकेचे काम परिणामकारक आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. या स्वंयशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला. हे कौतुक होत असतानाच आता वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कामगिरीची दखल घेतली आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका परिणामकारक काम करत आहेत. येथील संसर्ग, रुग्ण, मृत्यू याबाबतची आकडेवारी पारदर्शक आहे. यात कोणतीही लपवा छपवी केली जात नाही, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. वॉशिंग्टन पोस्टने भारतातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीबाबत लपवाछपती होत असल्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्ता येथील मृत्यूबाबतची आकडेवारी मागविण्यात आली होती. याबाबत मुंबई महापालिकेने सर्व अद्ययावत माहिती सादर केली, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कामगिरीची देखील घेण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरु होत असतानाच चहल यांची आयुक्तपदी नेमणूक झाली. चहल यांनी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत याबाबतची कामगिरी पारदर्शक राहील, यावर भर दिला. परिणामी सध्या तरी सर्वच स्तरातून पालिकेच्या या कामाचे कौतुक होत आहे.   

..............................

चेस द वायरस आणि ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंगची चतु:सूत्री
 
इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेस द वायरस आणि ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धती नुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. अभियान पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याची कार्यवाही सातत्याने केली जात आहे.

..............................

खाजगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय कोवीड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय इकबाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला होता.

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वीच केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे.

चेस द व्हायरस हे सूत्र घेऊन फिव्हर क्लिनीक्सच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला गेला; त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.

कोविडने बाधा झालेल्या व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्या विषयीची आकडेवारी व तपशिल हा मृत्यू झाल्यापासून ४८ तासांच्या आत व निर्धारित नमुन्यात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय. सी. एम. आर. च्या संकेतस्थळावर अपलोड करणे अत्यंत गरजेचे असून त्यानुसार सदर आकडेवारी ४८ तासांच्या अपलोड करण्याचे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.

..............................


 

Web Title: Mumbai's work in controlling Corona is effective; The Washington Post noted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.