Join us

मुंबईतील तरुण चौलमध्ये बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:20 AM

मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या मुलांच्या ग्रुपमधील एकाला रामेश्वरीच्या तलावात आपला जीव गमवावा लागला. पोहत असताना अचानक

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या मुलांच्या ग्रुपमधील एकाला रामेश्वरीच्या तलावात आपला जीव गमवावा लागला. पोहत असताना अचानक तलावाच्या मध्यभागी गेल्यावर या मुलाचा श्वास कोंडला, त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.मीत कोलमकर (१९), असे मृत मुलाचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे पाहण्यासाठी मुंबई लालबाग परिसरातील साधारणत: १० मुलांचा ग्रुप आला होता. रेवदंड्याचा किनारा पाहिल्यानंतर या मुलांचा ग्रुप चौल येथील रामेश्वर मंदिराजवळ आला. या तलावात गावातील मुले पोहत असल्याचे बघताच त्यांनाही पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर मीत व त्याचे काही सहकारी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या तलावात उतरले. मीत तलावात मध्यभागी गेल्यानंतर अचानक त्याला दम लागला. हे त्याच्या मित्रांच्या व तेथे पोहत असलेल्या स्थानिक मुलांच्या लक्षात येताच मीतला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित के ले.