मुंबई: गणेशोत्सवाची सांगता झाली. लगोलग आता नवरात्रौत्सवासाठी संपूर्ण मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा नवरात्रौत्सव मंडळेही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अधिकाधिक भक्तांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सध्या केला जात आहे. सामाजिक भान राखत नवरात्रौत्सव साजरा करणारी मंडळे ही मुंबईची खास ओळख आहे. गेल्या काही वर्षांत नवरात्रौत्सवची धूम ही काही उपनगरांची खास ओळख बनली आहे. त्यात मुलुंड, बोरीवली, विलेपार्ले, गोरेगाव, घाटकोपर, अंधेरी यांचा अग्रक्रम लागतो. नवरात्रौत्सवात गरबा खेळून मुंबईकर रात्र जागवतात. काही मंडळे ही गरब्यासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे गरबा खेळायला जाण्यासाठीही अनेकांनी आधीपासून सेटिंग करुन ठेवलेली आहेत. तरुणांच्या बरोबरीनेच महिलाही गरबा खेळण्यासाठी अधिक इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेण्ड सेट झाला आहे. त्यामुळे नसलेल्या रंगांच्या साडी, ड्रेसची खरेदीही महिलांनी उत्साहांनी केली आहे. यात पुरुषही मागे नाहीत. अनेकांनी त्या -त्या रंगाचे शर्ट खरेदी केले आहेत. अंबामातेच्या आगमनासाठी सर्व मुंबईकर सज्ज झाले आहेत. माऊलीच्या गाण्यांची धूमसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्याप्रमाणे आपापल्या बाप्पाचे प्रमोशन करण्यासाठी विविध प्रकारची गाणी तयार केली. त्याप्रमाणे, यंदाच्या नवरात्रौत्सवात बऱ्याच सार्वजनिक मंडळाने पुढाकार घेऊन गाणी तयार केली आहे. या गाणी तयार करण्याच्या प्रक्रियेत नव्या पिढीतील तरुण कलाकारांच्या फळीचा समावेश आहे. गाणे तयार करण्यासाठी मंडळांनी हजारो रुपये खर्च केले आहे. त्यामुळे आगमनापूर्वीपासूनच त्या-त्या परिसरात गाणी वाजवली जात होती. (प्रतिनिधी) टी-शर्ट्स आणि कुर्ते ‘माझगावची महालक्ष्मी’, ‘लालबागची राणी’ असे प्रिंट्स लिहिलेल्या टी-शर्ट्स आणि कुर्त्यांना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यात विशेष ट्रेंड असा दिसून येतो की, नवरात्रीतील नवरंगांप्रमाणे काही सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी त्या-त्या रंगांचे कुर्ते, टी-शर्ट्स आणि साड्यांचीही मागणी घाऊक विक्रेत्यांकडे केली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनेही आता कात टाकली आहे. तर, याचबरोबर आगमन सोहळ््यात टी-शर्ट, तर विसर्जन सोहळ््यात महिलांसाठी नऊवार साडी आणि पुरूषांसाठी सदरे सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवल्याचे फलक मंडळांनी ठिकाठिकाणी लावले आहेत. त्यामुळे प्रत्येक मंडळ कार्यकर्ते गोळा करून एकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. टी-शर्टच्या माध्यमातून मंडळाची पब्लिसिटी करण्यावर मंडळांचा भर आहे. आगमन सोहळेही दणक्यात गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पाद्यपूजन आणि आगमन सोहळ््यांची प्रथा सुरु झाली. हळूहळु या पाद्यपूजन आणि आगमन सोहळ््यांचे स्वरुप बदलून मोठ्या इव्हेंटमध्ये त्याचे रुपांतर होण्यास सुरुवात झाली. त्याचेच अनुकरण करत यंदा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनीही सुवर्णसंधी साधत जोरदार आगमन सोहळ््यांचे आयोजन केले. तसेच, ठिकठिकाणी आदिमातेचे पाद्यपूजन सोहळेही रंगले. काही मंडळांनी विसर्जन सोहळ््याची जय्यत तयारी आधीच सुरू केली आहे.
दुर्गेच्या स्वागतासाठी मुंबापुरी सजली
By admin | Published: October 13, 2015 2:34 AM