Join us  

मुंबापुरी दुमदुमली..!

By admin | Published: March 22, 2015 12:24 AM

गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात शनिवारच्या मंगलमय पहाटप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी मुंबापुरी दणाणून गेली.

मुंबई : गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात शनिवारच्या मंगलमय पहाटप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी मुंबापुरी दणाणून गेली. शोभायात्रांत तरुणाईने धारण केलेली मराठमोळी वेशभूषा आणि ढोल-ताशा पथकांनी यात्रांदरम्यान केलेल्या गजराने मिरवणुकांची शोभा आणखीच वाढली.नव्या वर्षाच्या गुढ्या उभारण्यासाठी अबालवृद्धांसह सर्वच मुंबईकर उत्साही झाल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच मुंबापुरीत रंगू लागले. ज्या ठिकाणांहून शोभायात्रा निघणार आहेत; अशा ठिकाणी रांगोळ्यांचे साज उमटू लागले होते. शिवाय रस्त्यारस्त्यावरील विजेच्या खांबावर भगवे झेंडे आणि शोभायात्रांच्या स्वागतासाठी भगव्या पताका फडकाविण्यात आल्या. तर दुसरीकडे शोभायात्रांचे स्वागत करण्यासाठी दादर फुल मार्केट शुक्रवारी रात्रभर ओसंडून वाहत होते.शनिवारची मंगलमय पहाट उजाडली आणि गुढी उभारून सुरू झालेल्या शोभायात्रांनी मुंबईचे रस्ते दणाणून गेले. नेहमी सुटाबुटात वावरणारी मुंबईकर तरुणाई मराठमोळ्या वेशात मुंबापुरीच्या रस्त्यावर उतरली. भगव्या फेट्यांचा साज ओढलेले तरुण आणि नऊवारी साड्यांत शोभायात्रा गाजविणाऱ्या तरुणी यांनी मुंबईचे रस्ते पादाक्रांत केले. त्यांच्या सोबतीला उतरलेल्या ढोल-ताशा पथकांनी तर गगनभेदी ‘नाद’ करत नववर्ष स्वागतयात्रांमध्ये उधाण आणले.गिरगाव येथे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा आर्यन हायस्कूल येथून सुरू झाली आणि तिचा समारोप चिराबाजार येथे झाला. तर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने फडके रोड येथील गणपती मंदिरापासून काढण्यात आलेल्या यात्रेने शोभेत आणखी भर घातली. सकाळपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या या यात्रांमध्ये लहान मुलांनी देवदेवतांच्या वेशभूषा साकारत मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. पश्चिम उपनगरातही जोगेश्वरी येथे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान ‘आरे वाचवा’ असा संदेश देण्यात आला. (प्रतिनिधी)गोरेगाव येथील नागरी निवारा परिसरात श्री मंगलमूर्ती गणेश मंदिराच्या ६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. श्रींची आरती, गुढी पूजन, पालखी सोहळा, शोभायात्रा आणि श्रींच्या मूर्तीचा अभिषेक असा हा कार्यक्रम झाला. शोभायात्रेदरम्यान तानाजी मालुसरे व संभाजीराजे यांच्यावर आधारित पोवाडे, भारूड सादर करण्यात आले.