Join us

मुंबापुरी महापरिनिर्वाण दिनासाठी सज्ज

By admin | Published: December 04, 2015 2:35 AM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी मुंबापुरी

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. विशेषत: मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी करत कंबर कसली असून, बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आता देशभरातून अनुयायांचा ओघ चैत्यभूमीकडे येऊ लागला आहे.महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत सुमारे २०० अधिकारी व ६ हजार कर्मचारी चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात २४ तासांकरिता पाळ्यांमध्ये कार्यरत असणार आहेत. शिवाजी पार्क परिसराच्या दक्षिण बाजूला ५० हजार १५० चौरस फूट निवासी मंडप व उत्तरेला ३८ हजार ५१४ चौरस फुटांचा निवासी मंडप याप्रमाणे एकूण ८८ हजार ६६४ चौरस फूट क्षेत्रफळाचा निवासी मंडप उभारण्यात येत आहे.भंतेजी यांच्याकरिता ७ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचा मंडप व प्रार्थनेसाठी ४०० चौरस फुटांचा मंच उभारण्यात येत आहे. भंतेजीकरिता स्काऊट गाईड हॉल येथे १०० व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. १८ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भोजन मंडप उभारण्यात येत आहे. २ हजार चौरस फूट क्षेत्रफळामध्ये स्वागत कक्ष, वैद्यकीय सेवा, अग्निशमन नियंत्रण कक्ष, नियोजन कक्ष इत्यादी व्यवस्था पुरविण्यात येत आहे.वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी सुमारे १०० डॉक्टर्स व १०० परिचारिका यांच्यासह आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीची चुकामुक झाल्यास शोधणे सोपे व्हावे याकरिता चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात १०० फूट उंचीवर हवेत तरंगणाऱ्या दोन फुग्यांची व्यवस्था, तसेच फुग्यांच्या खाली उद्घोषणा कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)