ख्रिसमससाठी मुंबापुरी सज्ज
By admin | Published: December 25, 2015 02:49 AM2015-12-25T02:49:09+5:302015-12-25T02:49:09+5:30
येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव हा ख्रिस्ती बांधवांतर्फे ख्रिसमस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. उद्या साजरा होणाऱ्या ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहरातील सर्व चर्च
मुंबई : येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव हा ख्रिस्ती बांधवांतर्फे ख्रिसमस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. उद्या (ता. २५) साजरा होणाऱ्या ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहरातील सर्व चर्च, तसेच ख्रिस्ती बांधव सज्ज झाले आहेत. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बाजारपेठाही फुलल्या होत्या.
शहर-उपनगरातील चर्चमध्ये रंगरंगोटी, सजावट, तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नाताळची सुरुवात मिसाने करण्यात येत असल्याने आज रात्री बारापासून होणार आहे. चर्चप्रमाणेच अनेक ख्रिस्ती बांधवांनी घरोघरी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा साकारला आहे. त्यासाठी लागणारे विविध सजावटीचे साहित्य बाजारातून खरेदी करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ख्रिसमस ट्री, तारे, मेरी, ख्रिसमस बोर्ड, बॉल आदी साहित्याची खरेदी करण्यात आली. सेंट मायकल चर्च, माउंट मेरी चर्च, सेंट थॉमस कॅथेड्रल आणि अफगाण चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून चर्चला रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण करण्यात आले आहे. चर्चमध्ये चमकदार रिबिन्स, स्टार, पताकांची सजावट करण्यात आली आहे. रात्रीपासून विविध कार्यक्रम सुरू झाले. शिवाय, फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवरही ख्रिसमस फिव्हर दिसत असून पार्ट्यांचे प्लॅनिंग, ख्रिसमस स्पेशल स्टेट्स आणि सांताच्या कॅप्स घालून डीपी अपडेट करण्यात सारे बिझी झाले आहेत.
वांद्रे पश्चिमेस असलेले माउंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध अशा प्रार्थनास्थळांपैकी एक होय. या चर्चचे नाव ‘बॅसेलिका आॅफ अवरलेडी आॅफ द माउंट’ असे आहे. हे चर्च जरी १०० वर्षे जुने असले तरी त्याला ३०० वर्षांचा इतिहास आहे. साधारणत: तीनशे वर्षांपूर्वी १७०० ते १७६० च्या दरम्यान मेरीमातेचा पुतळा समुद्रात सापडल्यापासून वांद्रे फेअरला सुरुवात झाली. यामागील एक आख्यायिका सांगितली जाते की, एका कोळी समाजाच्या माणसाला स्वप्नात दृष्टांत मिळाला की, समुद्रात पुतळा सापडेल, त्याची त्याने प्रतिष्ठापना करावी. कोळी समुदाय मेरीमातेला ‘मोत माउली’ म्हणूनदेखील संबोधतात.
सेंट अँड्र््यूज चर्च (वांद्रे - हिल रोड)
१५७५ मध्ये पोर्तुगीज मिशनरींच्या फादर मॅन्युअल गोम्स यांनी हे चर्च बांधले. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हे मुंबईतील एकमेव चर्च होते. चर्चचा क्रॉस हा एकाच दगडापासून बनवण्यात आला आहे. तो १८७० साली लावण्यात आला. २००३ साली या चर्चमधील वस्तूंना जसे फर्निचर, पेंटिंग्स आणि शिल्पे इत्यादी वस्तूंना ऐतिहासिक म्हणून घोषित करण्यात आले. या चर्चमध्ये एक छोटेसे संग्रहालयदेखील आहे
सेंट मायकल चर्च (माहीम)
माहीम बेटावर फ्रान्सिस्कांनी दोन चर्च बांधली. वरच्या माहीममध्ये सेंट मायकेल आणि खालच्या माहीममध्ये म्हणजे आज ज्या परिसराची दादर अशी ओळख आहे, त्या दादरच्या परिसरात नोस्सा सिनहोरादा साल्वाकाओ चर्च बांधले. यांपैकी सेंट मायकेल चर्च हे १५१० ते १५४० या दरम्यान बांधले गेले. तथापि, हे चर्च १५८५ च्या आधीपासूनच अस्तित्वात होते असे म्हटले जाते. ज्या फ्रान्सिस्कांनी हे चर्च बांधले त्यांना इंग्रजांनी १७२० सालात हाकलून दिले. त्यानंतर इंग्रजांचाच त्या चर्चवर ताबा होता. हळूहळू आता सर्व जाती-धर्मांचे लोक या चर्चला भेट देण्यासाठी येतात. माहीम कॉजवेच्या सिग्नलच्या कोपऱ्यावरच हे भव्य चर्च आहे. या चर्चच्या दर्शनी भागातच काँक्रीटचा एक भव्य क्रॉस आहे.
अफगाण चर्च (कुलाबा)
अफगाणमधील युद्धात धारातीर्थी पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ सन १८४७ मध्ये हे चर्च बांधले असून त्याला सेंट जॉन्स चर्च म्हणूनही ओळखले जाते. अफगाण युद्धात ब्रिटनच्या सैन्याचा पराभव झाला. मार्च १८४३ मध्ये आॅक्सफर्डच्या मदतीने ईस्ट इंडिया कंपनीने चर्चचा आराखडा तयार करण्यास सांगितले. जानेवारी १८८५ साली चर्चचे काम सुरू झाले आणि १८६५ मध्ये संपले. या चर्चच्या आवारात छोटेखानी चॅपलसुद्धा आहे.