Join us

होळीसाठी मुंबापुरी सज्ज

By admin | Published: March 10, 2017 6:12 AM

होळीसाठी मुंबईतला चाकरमानी कोकणाकडे मोठ्या संख्येने रवाना होत असला तरीदेखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर होळीसह धुळवड साजरी केली जाते. विशेषत: मागील अनेक वर्षांपासून

- अक्षय चोरगे,  मुंबईहोळीसाठी मुंबईतला चाकरमानी कोकणाकडे मोठ्या संख्येने रवाना होत असला तरीदेखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर होळीसह धुळवड साजरी केली जाते. विशेषत: मागील अनेक वर्षांपासून जाणवलेल्या पाण्याच्या दुर्भिक्षावर वरचेवर मुंबईकरांनी पाणी वाचवण्यावर भर दिला आहे. आजही सामाजिक जाणीव म्हणून कमीत कमी पाणी वापरण्यावर मुंबईकरांकडून भर दिला जात असून, या वर्षीच्या होळीसाठी मुंबईच्या बाजारपेठांत पर्यावरणपूरक साहित्याची ‘जत्रा’च भरली आहे. विशेषत: पर्यावरणपूरक रंगांनी बाजारपेठा सजल्या असून, चिमुकल्यांसाठीच्या विविध पिचकाऱ्यांनी बाजारपेठांना एक वेगळाच ‘रंग’ चढला आहे.मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाने होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये मुंबईकरांनी होळीसाठी झाडे तोडू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. झाडे तोडणे हा अपराध कोणी केल्यास संबंधिताला पाच हजारांचा दंड तसेच एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असे महापालिकेने म्हटले आहे. दुसरीकडे होळीसाठी पर्यावरणपूरक रंग वापरा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. बेस्ट बस स्टॉपवर मंडळातर्फे हे आवाहन करण्यात आले असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षी मुंबईकर या उपक्रमाला पाठिंबा देतील, असा आशावाद मंडळाने व्यक्त केला आहे.पिशव्यांचा वापर करू नकारंगपंचमीला फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. फुगे आणि पिशव्या खरेदीचे प्रमाण या दोन वर्षांमध्ये बरेच कमी झाले आहे. परंतु त्यांचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही. अशा फुग्यांसह पिशव्यांनी अनेकांना अपघात झाल्याच्या दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. परिणामी, फुगे अथवा पाण्याने भरलेल्या पिशव्यांचा वापर करू नका, अशा आशयाचे संदेश सामाजिक संघटनांमार्फत दिले जात आहेत.चिमुकल्यांसह तरुणाईची झुंबडचिमुकल्यांसाठीच्या आकर्षक पिचकाऱ्या, नैसर्गिक आणि रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पांढरे सदरे व कुर्ते अशा होळीसाठीच्या साहित्याने बाजारपेठेत ठाण मांडले आहे. या साहित्याची खरेदी करण्यासाठी चिमुकल्यांसह तरुणाईची झुंबड उडत आहे.बाजारपेठा सजल्या : मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारपेठा होळीसाठी सजल्या आहेत. क्रॉफर्ड मार्केट, मनिष मार्केट या बड्या बाजारपेठांसह दादर, वांद्रे, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि मानखुर्द या प्रमुख बाजारांत धुळवडीच्या साहित्याच्या खरेदी-विक्रीला उधाण आले आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसह छोट्या-मोठ्या दुकानांवरील खरेदी-विक्री वाढत असून, यात चिमुकल्यांच्या गर्दीत भर पडत आहे.काव्यमय होळी : शनिवारी येऊन ठेपलेल्या होळीसाठीची तयारी जोमाने सुरू झाली असून, विविध मंडळे आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून होळीदिनी काही ठिकाणी काव्यमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आकर्षक पिचकाऱ्यादहा रुपयांपासून ते थेट तीनशे-चारशे रुपये किमतीच्या पिचकाऱ्या बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने अँग्री बर्ड पिचकारी (६० रुपये), पंखा पिचकारी (१०० ते १२० रुपये), छोटा भीम पिचकारी (४० रुपये), हत्ती, घोडा, मिकी माऊस पिचकारी (३० रुपये) अशा विविध पिचकाऱ्यांचा समावेश आहे. यात बॅग पिचकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पिचकरी खरेदी करण्यास चिमुकल्यांची गर्दी होत आहे.लाकडांची खरेदीहोळीसाठी झाडे तोडू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळ अथवा आयोजकांकडून होळीसाठीची लाकडे विकत घेण्याकडे कल आहे. यात गोवऱ्या आणि सुकलेल्या गवताचा समावेश आहे.