चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:05 AM2021-05-18T04:05:59+5:302021-05-18T04:05:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी मुंबईलगत दाखल झाले आणि मुंबईसह ठाणे व ...

On the Mumbapuri slow track due to the cyclone | चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर

चक्रीवादळामुळे मुंबापुरी स्लो ट्रॅकवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी मुंबईलगत दाखल झाले आणि मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत ठिकठिकाणी वादळी वारे वाहू लागले. सोबतच जाेरदार काेसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना धडकी भरली. सकाळी दहा वाजल्यानंतरही पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा वेग कायम होता. उपनगरी रेल्वेच्या सेवेत आलेले अडथळे, सुरक्षेच्या कारणास्तव मोनो रेलची खंडित केलेली सेवा यामुळे काेराेना संकटकाळातही धावती मुंबई स्लाे ट्रॅकवर आली.

रविवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत मुंबईत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी पहाटे तीन वाजता जोर धरला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाचा वेग कमी असला तरी वारे प्रचंड वेगाने वाहत हाेते. सकाळी साडेनऊ वाजता भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुन्हा पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पावसाचा वेग कायम राहील, असा अंदाज वर्तविला होता. ताे खरा ठरवत सकाळी साडेनऊनंतर मुंबईच्या उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जाेर धरला. वाराही प्रचंड वेगाने वाहत असल्याने कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागले. रात्री उशिरापर्यंत मुंबईत अशीच स्थिती हाेती.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.

* मोनो बंद

प्रचंड पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे सोमवारी सकाळी दहा वाजता चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनो रेलची सेवा खंडित करण्यात आल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.

* सकाळी साडेसहापर्यंत २० मिमी पाऊस

कुलाबा वेधशाळा येथे सोमवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत २० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या चोवीस तासांतील ही सर्वांत मोठी नोंद असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

* सी लिंक बंद

दक्षिण मुंबईला जोडणारी सी लिंक चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दिली. मुसळधार पावसाच्या सरी आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सी लिंक प्रवासाकरिता बंद केल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

* सिद्धिविनायकाचा धावा

मुंबईवर आलेले चक्रीवादळाचे संकट दूर कर, अशी प्रार्थना मुंबईकरांनी देवाकडे केली. विशेषतः प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मुंबईवरील संकट दूर व्हावे, यासाठी मंत्रोच्चार करण्यात आला.

* मुंबई विमानतळ तब्बल ७ तास बंद

तौउते’ चक्रीवादळाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सोमवारी विमानतळ ७ तास बंद ठेवण्यात आले. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची सूचना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि कार्गो विमानसेवा सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली विमाने अन्यत्र वळविण्यात आली. त्यात स्पाइस जेटचे १ आणि इंडिगोच्या दोन विमानांचा समावेश होता.

चेन्नईहून निघालेले स्पाइस जेटचे विमान सकाळी ८.१५ वाजता मुंबई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते; परंतु हवामानातील बदलांमुळे हे विमान सुरतच्या दिशेने वळविण्यात आले. त्याचप्रमाणे लखनौवरून मुंबईला येणारे इंडिगोचे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले, तर सतर्कतेचा इशारा मिळताच इंडिगोचे आणखी एक विमान हैदराबाद विमानतळावर वळविण्यात आले. जवळपास २०० विमान फेऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.

* ऐनवेळी विमाने रद्द केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

ऐनवेळी विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. चक्रीवादळाची पूर्वसूचना ८ दिवसांपूर्वी मिळाली होती. किनारपट्टी जवळ असल्याने मुंबई विमानतळाला त्याचा फटका बसणे साहजिक होते. अशावेळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय दोन-तीन दिवस आधीच जाहीर करणे गरजेचे होते, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.

-------------------------

Web Title: On the Mumbapuri slow track due to the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.