मुंबईत आता गालगुंडाचा शाेध घेणार; महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:01 AM2023-12-14T10:01:13+5:302023-12-14T10:02:21+5:30
मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग एकूण मुंबईत किती रुग्ण आहेत आणि ती याची माहिती घेणार असून त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यातील इतर भागात गालगुंडचे रुग्ण पाहावयास मिळत आहेत. हा आजार विषाणूसंसर्गाने होत असल्यामुळे या नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात दरवर्षी या रुग्णांचे प्रमाण दिसत असते. विशेष करून लहान मुलांमध्ये हा आजार दिसत असून यामुळे लहान मुलांना अन्न गिळण्यास त्रास होत असतो. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग एकूण मुंबईत किती रुग्ण आहेत आणि ती याची माहिती घेणार असून त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून लहानपणीच गोवर, गालगुंड आणि रुबेलाचे लसीकरण मुलांमध्ये करण्यात येते. एकमेव मुंबई पालिका आहे ज्या ठिकाणी तिन्ही लसी मोफत देतात. तरीही काही प्रमाणात मुंबई शहरात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत.
गालगुंड म्हणजे काय ?
अन्नाचे पचन होण्यासाठी ज्या विशिष्ट लाळग्रांथीमधून लाळ मिसळली जाते, त्या पॅराटिड ग्लॅन्डला विषाणू संसर्गामुळे सूज येते.
सुज आल्यामुळे अन्न खाताना त्रास होताे.
काही वेळा ताप येतो. डोके आणि कान दुखतात. गालाच्या एका बाजूस सूज येते.
या आजरावर वेळेतच उपचार केले नाही, तर
त्याचा परिणाम मेंदूवर होण्याची शक्यता असते.
प्रामुख्याने लहान मुलांना होणारा काही वेळा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा दिसून येतो.
उपचार काय ?
याप्रकरणी अंधेरी येथील कोकिलाबेनअंबानी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाच्या डॉ क्षमा कोवळे सांगतात, काही प्रमाणात मोठ्या माणसांमध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो. त्यावर आम्ही ठरलेली उपचार पद्धतीप्रमाणे औषधे दिले जातात.
आरोग्य विभागामार्फत याचे किती प्रमाण याचे सर्वेक्षण केले जाईल. विशेष म्हणजे आपल्या पालिकेतर्फे या आजरावरील प्रतिबंधात्मक लस बालकांना मोफत दिली जाते. त्याचा सुद्धा आम्ही आढावा घेऊ. नागरिकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. - डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई पालिका
या आजाराला प्रतिबंध करणारी लस संपूर्ण राज्यातील बालकांना देणे गरजेचे आहे. यामुळे पालकांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो. या आजारावरील उपचार वेळेत केले नाहीतर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. - डॉ. उपेंद्र किंजवडेकर, अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना