Join us

कर्नाक पुलासाठी जूनचा मुहूर्त? गर्डरचे कामही जोरात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:50 AM

ब्रिटिशकालीन पूल, ७० टक्के काम पूर्ण, गर्डरचे कामही जोरात सुरू.

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकदरम्यानच्या ब्रिटिशकालीन १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाच्या कामाला वेग आला आहे. सध्या या पुलाचे मूळ पाया उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुलावर टाकण्यात येणाऱ्या गर्डरचे कामही जोरात सुरू असून, ७० टक्केहून अधिक काम पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत पूल उभारणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाचा भाग जुलै २०१८ मध्ये कोसळल्यानंतर जीर्ण अवस्थेतील ब्रिटिशकालीन पुलाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. सीएसएमटी-मस्जिद स्थानकादरम्यान असलेला दक्षिण मुंबईतील जुन्या पुलांपैकी एक असलेला कर्नाक बंदर पूल लोखंडी गर्डर, दगडी बांधकामाचा वापर करून उभारण्यात आला असून, तो जीर्ण झाल्याने आयआयटी बॉम्बेने २००९ मध्ये या पुलाला धोकादायक घोषित केले. 

कर्नाक पूल :

१) पुलाचे निर्मिती वर्ष - १८६६ २)जड वाहतुकीसाठी पुलाचा वापर बंद - नोव्हेंबर २०१३ ३) पुलाचे तोडकाम - २० ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ ४) पुलाची पुनर्बांधणी - २० नोव्हेंबर २०२२ ते २० जून २०२४

त्यानंतर पालिकेने जुना पूल बांधून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे निश्चित केले. कर्नाक उड्डाणपूल १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाडण्यात आला. दरम्यान, या पुलाच्या खाली असणारी अतिक्रमणे तसेच व्यावसायिक गाळे या कामात अडथळे ठरत होती. 

पालिका व रेल्वे प्राधिकरणाचा समन्वय : १) मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकाच्या पूर्व भागातील टाटा कंपनीच्या दिशेला पुलाचा मूळ पाया उभारण्यात येत आहे. 

२) सिमेंट काँक्रीटचा वापर करून मुख्य पाया उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे, तर पुलाच्या पश्चिम दिशेलाही पुलाचा मूळ पाया उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

३) दोन्ही दिशेने काम सुरू असतानाच दुसरीकडे टाटा कंपनीच्या दिशेला पुलावरील गर्डर उभारणी करण्याचे कामही जलद गतीने सुरू आहे. मुंबई महापालिका व रेल्वे प्राधिकरण यांच्या समन्वयाने हे काम सुरू आहे. 

१२ अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान :

त्यामुळे येथील एकूण १२ अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान प्रशासनापुढे होते. यातील बहुतांशी बांधकामे हटवल्यामुळे पुलाच्या कामाला वेग आला आहे. जून २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामध्य रेल्वे