महामानवाच्या जयंतीसाठी मुंबापुरी सज्ज

By admin | Published: April 14, 2016 04:14 AM2016-04-14T04:14:22+5:302016-04-14T04:14:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून अवघ्या मुंबापुरीत गुरुवारी विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

Munibpuri ready for the birth anniversary of Mahanuva | महामानवाच्या जयंतीसाठी मुंबापुरी सज्ज

महामानवाच्या जयंतीसाठी मुंबापुरी सज्ज

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून अवघ्या मुंबापुरीत गुरुवारी विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गुरुवारी प्रबोधन फेऱ्या, मोटारसायकल रॅली, शिल्प आणि रांगोळी अशा विविध माध्यमांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. आंबेडकरी संघटनांशिवाय विविध राजकीय पक्ष, बौद्धेतर संघटना आणि सर्वसामान्य जनताही मोठ्या उत्साहात जयंती सोहळ्यात सामील झाल्याचे चित्र आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून चर्चासत्र, परिषद यांच्यासह पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वरळीत राजगृहाची प्रतिकृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ९७ समोरील पटांगणात बुधवारी सायंकाळी ‘राजगृह’च्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. बाबासाहेब यांच्या ग्रंथप्रेमाचे प्रतीक म्हणजे ग्रंथांसाठी त्यांनी बांधलेले घर अर्थात ‘राजगृह’ची १६ बाय ८ फुटाची थर्माकॉलची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे.
गुरुवारी अनुयायांना प्रतिकृती पाहता येईल. या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘राजगृह’चा बॅकड्रॉप हा बाबासाहेबांच्या ‘राजगृह’तील ग्रंथालयासारखा उभारण्यात आलेला आहे. त्या ग्रंथालयात आंबेडकर यांनी लिहिलेल्या जवळपास २५ ग्रंथ व पुस्तके यांच्या मूळ प्रतींच्या मुखपृष्ठांचा आणि ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकांच्या पहिल्या अंकांचा वापर करण्यात आलेला आहे. या वेळी बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांविषयीच्या मूळ ध्वनिचित्रफिती मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आल्या.
‘राजगृह’ आणि सिद्धार्थ महाविद्यालय ग्रंथालयाचे प्रथम ग्रंथपाल शा.शं. रेगे यांच्या ‘भीमपर्व’ या पुस्तकातील ‘बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम’ या लेखाचे मराठी व इंग्रजी भाषेतील पत्रकाचे लोकार्पणही या वेळी झाले. खासदार अरविंद सावंत, कायद्याने वागा चळवळीचे प्रणेते राज असरोंडकर, सोमय्या महाविद्यालयातील मराठी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. वीणा सानेकर, मुस्लीम अभ्यासक नौशाद उस्मान यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

धारावीत प्रथमच बौद्धेतर समाजाची रॅली
धारावीत प्रथमच बौद्धेतर समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी प्रबोधन रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत धारावीतील संत कक्कया विकास संस्था संचालित श्री गणेश विद्या मंदिर, आंध्र-कर्नाटक दलित वर्ग संघ संचालित डॉ. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कामराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बी.एस.आय.एस. हायस्कूल व प्रेरणा तनिष्का व्यासपीठ इत्यादी संस्थांमधील शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या वेळी प्रेरणा तनिष्का व्यासपीठातील महिला ढोल पथक रॅलीत सलामी देणार आहे. रॅलीची सुरुवात क्रॉस रोडवरील गणेश मंदिर येथील बी.एस.आय.एस. हायस्कूल येथून होईल, पुढे आंबेडकर शाळा, कामराज शाळा या मार्गाने कृष्ण मेनन मार्ग ९० फुटी रस्त्यावरून, संत रोहिदास मार्ग, संत कक्कया मार्गावरील श्री गणेश विद्या मंदिर येथे रॅलीची सांगता होईल. चर्मकार व अन्य बौद्धेतर समाजाच्या पुढाकारातून धारावीत पहिल्यांदाच अशा रॅलीचे आयोजन होत आहे.

बाबासाहेबांवर ‘कॉफीटेबल बुक’
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या ‘कॉफीटेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन करण्यात येणार आहे. दादर पश्चिमेकडील चैत्यभूमीवर सकाळी ७.३० वाजता हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आज ‘संविधान गौरवयात्रा’ : बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता चैत्यभूमी येथून ‘संविधान गौरवयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून चैत्यभूमी ते नायगाव मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दादर चैत्यभूमी येथून सुरुवात झालेली मोटारसायकल रॅली टिळक ब्रिजमार्गे नायगाव येथील सदाकांत ढवण मैदान येथे समाप्त होईल. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

चेंबूरमध्ये १२५ फुटांची रांगोळी
बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या पटांगणात १२५ फूट बाय ८० फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. पुढील १० दिवस ही रांगोळी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून आतापर्यंतची बाबासाहेबांची सर्वात मोठी रांगोळी असल्याचा दावा रांगोळीकर आदम अली मुजावर यांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या रांगोळीची तयारी करण्यात आल्याचे माजी समाजकल्याण मंत्री व जयंती सोहळ्याचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. रांगोळीसाठी मैदानात २०० फुटांचा मंडप साकारण्यात आला आहे. रांगोळीकार मुजावर आणि त्यांचे १० सहकारी गेल्या ७ दिवसांपासून रांगोळी काढत होते. त्यासाठी
त्यांना ३ टन रांगोळी आणि ७०० किलो रंग लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती समारंभ बुधवारी चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालयात औद्योगिक कामगार संघटनेतर्फे साजरा करण्यात आला. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयात झालेल्या या कार्यक्रमात मुद्रणालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशिष शेलार यांनी अभिवादन केले. या वेळी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस विलास दळवी उपस्थित होते. या वेळी विविध क्रीडा प्रकारांत विजयी ठरलेल्या कामगारांच्या संघाचा गौरव करण्यात आला.

Web Title: Munibpuri ready for the birth anniversary of Mahanuva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.