मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सहा तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला. सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले आणि सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पी. वेलारसू यांचे नाव नव्हते. मात्र, महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. त्यावेळी वेलारसू हेच या सर्वांची देखरेख करत असल्यामुळे ईडीने मंगळवारी त्यांची चौकशी केली.
२०२० मध्ये मुंबई महानगरपालिकेने ज्या बॉडी बॅग्ज खरेदी केल्या त्याकरिता प्रतिबॅग ६८०० रुपये पालिकेने मोजले होते. मात्र पालिकेने ज्या कंत्राटदाराकडून या बॉडी बॅग्जची खरेदी केली त्याच कंत्राटदाराकडून राज्य सरकारने देखील त्याच काळात बॉडी बॅग्ज खरेदी केल्या होत्या. परंतु, त्याकरिता प्रतिबॅग दोन हजार रुपये अदा केले होते.
किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी ज्या कंत्राटदाराकडून या बॉडी बॅग्जची खरेदी करण्यात आली त्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी बुधवारी त्यांची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली होती. एका वर्षाने मुंबई महानगरपालिकेने त्याच कंत्राटदाराकडून प्रतिबॅग ६०० रुपये दराने बॉडी बॅग्जची खरेदी केली होती. त्यामुळे या किमतीमध्ये इतका फरक कसा आला, याची चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत.