मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पालिका प्रशासनाची मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील येथील कोळी बांधवांच्या घरांवर गेले काही दिवस तोडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे येथील भूमीपूत्रांमध्ये तीव्र नाराजी होती.
मढ कोळीवाडा,नवानगर येथील मालतीन महादेव सोनार यांच्या जुन्या घराच्या नुतनीकरणाचे काम चालू होते. त्यांना पालिका आज घर तोडण्यासाठी येणार आहेत याची माहिती मिळाली.आता काय होणार या भीतीने काल हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. येथील तोडक कारवाई बाबत उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिकेचे पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची आज दुपारी पालिका मुख्यालयात भेट घेतली.
काकाणी यांच्या दालनात झालेल्या सदर बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईचे मुळ भूमिपूत्र कोळी समाज आहे. त्यांची कुटुंब मोठी झाल्याने ते आपली जुनी घरे दुरूस्ती करतात. मात्र पालिका प्रशासन त्या बांधकामांवर तोडक कारवाई करून अन्याय होत आहे. त्या करिता नवीन सरळ कायदा नियमावली तयार करावी. ती तयार करण्यापूर्वी मुंबईच्या गावठाण मधील कोळी बांधवांचे घर तोडक कार्यवाही थांबवावी. अशी आग्रही मागणी केली.
सुरेश काकाणी यांनी सदर तोडक कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश दिले तसेच नविन विकास नियमावली लवकरात तयार करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे कोळीवड्यातील घरांवरची कारवाई आता थांबणार असल्याने येथील कोळीबांवांनी समाधान व्यक्त केले.
सदर बैठकीत पालिकेचे मुख्य अभियंता विकास आराखडा चितोरे, मुबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा पालिका गट नेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, भाजपा मालाड पश्चिम मंडळ अध्यक्ष सुनील कोळी, नगरसेविका योगिता कोळी, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, नगरसेवक कमलेश यादव,भाजपा उपाध्यक्ष युनूस खान, नगरसेविका सेजल देसाई, मढ मच्छिमार संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद कोळी, तुकाराम कोळी, मढ दर्यादीप मच्छिमार संस्था अध्यक्ष संतोष कोळी, हरबादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.