पुलांच्या देखरेखीबाबत पालिका प्रशासन उदासीन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:14 AM2020-03-05T00:14:43+5:302020-03-05T00:14:50+5:30
गेल्या दोन वर्षांमध्ये पुलांच्या दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासन पुलांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे?
मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये पुलांच्या दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासन पुलांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे? याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकालगतचा पादचारी पूल कोसळून वर्ष उलटत आले तरी अद्याप पुलांच्या देखरेखीचा प्रश्न ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे कोणतेही उत्तर मात्र पालिका प्रशासनाकडे नव्हते.
मार्च २०१९ रोजी हिमालय पादचारी पूल कोसळून सात प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट केले. तसेच मुंबईतील पुलांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पूल विभागात अभियंत्यांची संख्या कमी असल्यामुळे अद्याप या प्राधिकरणाची स्थापना झालेली नाही. भाजप सदस्यांनी याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारला.
या प्राधिकरणाच्या प्रमुखपदी पूल विभागाचे उपप्रमुख अभियंता एस. जी. ठोसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्राधिकरणाची रचनाच निश्चित झालेली नाही. अभियंत्यांची ३० टक्के पदे रिक्त असून पूल विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यामुळे प्राधिकरणासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या प्राधिकरणाची नियुक्ती रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मात्र प्रशासनाकडून याबाबत ठोस उत्तर मिळू शकले नाही.
>स्वतंत्र प्राधिकरणाचा प्रस्ताव!
मुंबईतील एकूण ३७४ पुलांची देखभाल पालिकेतर्फे केली जाते. यामध्ये उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग, स्काय वॉक यांचा समावेश आहे. एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या पुलांचाही यामध्ये समावेश आहे. या पुलांच्या नियमित देखभालीसाठी पालिकेच्या अखत्यारीत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार होते.
>आतापर्यंत झालेल्या पूल दुर्घटना
जून २०१८ - अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा भाग कोसळून दोन मृत्यू, चार जखमी.
आॅक्टोबर २०१७ - चर्नीरोड स्थानकाजवळील पादचारी पुलाचा जिना कोसळून एक जखमी.
डिसेंबर २०१५ - मालाड ते मालवणीदरम्यानचा एव्हरशाइन नगर येथील पूल कोसळून नऊ जखमी.