कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:31+5:302020-12-22T04:07:31+5:30
पालिका आयुक्त : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्ग मुंबईत नियंत्रणात आला असला ...
पालिका आयुक्त : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्ग मुंबईत नियंत्रणात आला असला तरी थोडाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क असून काेराेनाच्या या काळात केलेल्या चुका टाळण्यासाठी कठाेर पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार ‘नव्या कोविड’शी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
१ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. त्या काळात परदेशातून दोन लाख प्रवासी मुंबईत आले. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
९ मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटुंब आखाती देशातून आले हाेते. तर, मुंबईत आढळलेला पहिला रुग्णही याच प्रवाशांबराेबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. तर परदेशातून आलेले काही प्रवासी इतर विमानतळांवर उतरून मुंबईतील आंतरदेशी विमानतळावर येत होते. सुरुवातीला आंतरदेशी विमानतळावरही प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात नव्हते, असे आयुक्तांनी निदर्शनास आणले.
* अशी उचलणार पावले
- परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतच क्वारंटाईन व्हावे लागेल. मुंबईबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना सात दिवस घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही.
- इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंंटाईन करण्यात येणार आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करून घरी पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- बुधवारपासून युरोपमधील इतर देश आणि मध्य पूर्व आशिया खंडातून येणाऱ्या प्रवाशांना पालिकेच्या केंद्रांमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल.
........................