तिसऱ्या त्यातील लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:07 AM2021-02-28T04:07:23+5:302021-02-28T04:07:23+5:30

तिसऱ्या त्यातील लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज तयारी अंतिम टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहर उपनगरात लवकरच लसीकरण प्रक्रियेचा ...

The municipal administration is ready for the third vaccination | तिसऱ्या त्यातील लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

तिसऱ्या त्यातील लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

Next

तिसऱ्या त्यातील लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहर उपनगरात लवकरच लसीकरण प्रक्रियेचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, लसीच्या साठ्यासाठी जागा पाहणे आणि लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे यासाठी महापालिकेचे गतीने प्रयत्न सुरू आहेत. विविध विमा योजनेत सहभागी असलेल्या ३५ सरकारी रुग्णालयांचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात येणार आहे; याकरिता मुंबई पालिकेकडून या रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही संख्या अधिक असल्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविणेही गरजेचे आहे. त्यामुळे आता खासगीसह इतर सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयांसह प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसह इतर विमा योजनेत सहभागी असणाऱ्या रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील अशा ३५ रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य विभागाने दिली असून लसीकरणाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार नोंदणी करून लसीकरण प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना सहभागी करण्यात आले असून ३२ रुग्णालयांना परवानगी दिली आहे. यातील १२ रुग्णालयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही सुरू झाले आहे. मार्चपासून आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असे काकाणी यांनी सांगितले.

चौकट

केंद्राकडून कार्यान्वित होणार ॲप

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ॲपवर नोंदणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून कोविन ॲपचे अद्ययावत व्हर्जनचे अनावरण करण्यात येणार आहे; त्यानंतर सर्व राज्यांमध्ये हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार असून ॲपवर सर्वांना नोंदणी करता येईल. ॲपविषयी व त्याच्या प्रक्रियांविषयी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून माहिती व जनजागृती करण्यात येणार आहे.

उपलब्धता वाढविणार

सर्वसामान्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. वॉर्डनिहाय लसीकरण केंद्रांची उपलब्धता असल्यास तेथील लोकसंख्येचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही यादृष्टीने नियोजन सुरू आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व लसीकरण केंद्रांवर सुरक्षित अंतराचा निकष पाळणे महत्त्वाचे आहे. १६ जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी लसीकरण केंद्रे व उद्दिष्टही मर्यादित ठेवले होते. ते वाढवावे यासाठी पालिकेने विचारणाही केली होती. जंबो सुविधा तसेच इतर रुग्णालयांमधील मोठ्या जागा असल्यामुळे सुरक्षित अंतराचा निकष काटेकोरपणे पाळला जाईल, असा विश्वासही पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अशी करा नोंदणी

६० वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या व्यक्तींना तसेच ४५ वर्षे वयावरील आजारी व्यक्तींना ही लस घेता येणार आहे. या ॲपमध्ये त्यांना स्वत: रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

लसीकरण केंद्रावर जाऊन (ऑनसाइट) आयत्या वेळी रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल.

त्यावेळी उपलब्धतेनुसार लस घेताही येऊ शकते.

वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, फोटो आयडी किंवा वयाचा पुरावा असलेले अन्य कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र अनिवार्य

४५ वर्षे वयांवरील आजारी व्यक्तींसाठी सरकारने दिलेला तयार फॉर्म डाऊनलोड करून तो त्यांच्या फॅमिली फिजिशियन किंवा संबंधित डॉक्टरांकडून भरून घेऊन तो प्रमाणित करून घ्यावा.

Web Title: The municipal administration is ready for the third vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.