एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:29+5:302021-03-25T04:07:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी ...

Municipal administration ready for vaccination starting from April | एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी पालिका प्रशासन सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, आणखी डोसची मागणी करणे या पातळ्यांवर वेगाने हालचाली सुरू आहेत.

मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असताना केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून यामुळे संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होईल. लसीकरणाच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून मे महिन्यापर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होईल, त्यानुसार सध्या प्रशासन पातळीवर काम सुरू असल्याचे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी मांडले.

सध्या मुंबईत १०० लसीकरण केंद्रे असून रोज जवळपास पन्नास हजार लसीकरण केले जाते. लवकरच १२५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येतील. रोज ७५ हजार लोकांना लस दिली जाईल. रोज एक लाख लोकांना लस देण्याचा निर्धार असून त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये नि:शुल्क तर सद्यस्थितीत एकूण ५९ खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, आता धारावीतही लसीकऱण केंद्र सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात समुपदेशन, पथनाट्यांद्वारे माहिती देण्यात येत आहे.

आयुक्तांना निवेदन

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अजूनही गरजू व्यक्तींना लस मिळत नाही. समाजात आज अनेक रुग्ण हे अंथरुणाला खिळलेले आहेत. तसेच शारीरिक विकलांग असलेल्या दिव्यांगांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना लसीकरणाची गरज असून, यासाठी २४ विभाग कार्यालयांमध्ये मोबाइल व्हॅन तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून या सर्वांना घरपोच लसीकरणाची मोहीम राबवता येईल, असे भाजपचे नगरसेवक अनिष मकवानी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Municipal administration ready for vaccination starting from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.