एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सज्ज
पालिका प्रशासन; तीन लाख लसींचा पुरेसा साठा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरणात अधिकाधिक लोकांचा समावेश करावा यादृष्टीने केंद्र सरकारने ४५ व त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे, मुंबई महानगरपालिकाही या टप्प्यातील लसीकरणासाठी सज्ज असून सध्या तीन लाख लसींचा पुरेसा साठा असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना येत्या १ एप्रिलपासून लस देण्यात येईल. ३१ मेपर्यंत म्हणजे दोन महिन्यांत हे लसीकरण पूर्ण करण्यात येईल, लसीकरणाबाबत ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार, टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू आहे. पावसाळ्यात लसीकरण करण्यात अडचण येण्याची शक्यता लक्षात घेऊन एप्रिल, मे महिन्यात ते करण्याचे नियोजन केल्याचे काकाणी यांनी सांगितले. पालिकेच्या काही केंद्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ या दोन सत्रांत लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत दिवसभरात ३८,१५८ जणांना लस देण्यात आली. त्यातील ३४,५६५ जणांना पहिला तर ३,५९३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १० लाख ८६ हजार ८५२ जणांना लस देण्यात आली. त्यात ९ लाख ४२ हजार ३२१ जणांना पहिला तर १ लाख ४४ हजार ५३१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख ४० हजार १८६ आरोग्य कर्मचारी, २ लाख ४० हजार २५४ फ्रंटलाइन वर्कर्स, ५ लाख १६ हजार ४१५ ज्येष्ठ नागरिक तर ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या ८९,९९७ जणांना लस देण्यात आली.
* दर आठवड्याला ३३ लाख लसींचा साठा देण्याची केंद्राकडे मागणी
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर शनिवारी २०,७१३ तर आतापर्यंत ७ लाख ५१ हजार ९६२ जणांचे लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर ३,०३७ तर एकूण ५३,७४२ जणांचे लसीकरण करण्यात आले. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर १४,४०८ जणांना तर आतापर्यंत एकूण २ लाख ८१ हजार १४८ जणांना लस देण्यात आली. दरम्यान, दर आठवड्याला ३३ लाख लसींच्या डोसचा साठा पुरवावा याकरिता केंद्र शासनाकडे मागणी केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - २,४०,१८६
फ्रंटलाइन वर्कर्स - २,४०,२५४
ज्येष्ठ नागरिक - ५,१६,४१५
४५ ते ५९ वय - ८९,९९७
एकूण - १०,८६,८५२
...............................