Join us

कोविशिल्ड लसीविषयी पालिका प्रशासन अहवाल सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विषाणूवरील लसीकरणाची पूर्वतयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. या संदर्भात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूवरील लसीकरणाची पूर्वतयारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. या संदर्भात पालिका क्षेत्राच्या कृती दलाची (टास्क फोर्स)ची पहिली बैठक नुकतीच पार पडली. मुंबईतील ८ रुग्णालयत लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली असून, ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीबाबत अंतिम अहवाल पालिका प्रशासनाकडून लवकरच काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) सादर करण्यात येणार आहे.

नायर आणि केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी पार पडली. या चाचणीत सुमारे २४८ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, या लसीचा डोस अखेरच्या स्वयंसेवकाला दिल्यानंतर जवळपास ४० दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते, शिवाय या सहभागी स्वयंसेवकांच्या विविध वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही या प्रक्रियेत ग्राह्य धरले जातात.

केंद्र सरकारने ८ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचनेनुसार आरोग्य सेवकांचा (हेल्थ केअर वर्कर्स) डेटा बेस कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजार सेवकांचा डेटा या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण १ लाख २६ हजार ३७८ सेवकांचा डेटा अपलोड करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. सध्या लसीचा साठा ठेवण्यासाठीही मुंबईसह सर्व पातळ्यांवर पालिका प्रशासन तयारी करत आहे.

......................................