पालिका प्रशासक चहल ॲक्शन मोडमध्ये; मान्सूनपूर्व आढावा बैठक : कामे १५ मे पूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 09:08 AM2022-03-09T09:08:37+5:302022-03-09T09:08:43+5:30

मुंबई महापालिकेचा कारभार ८ मार्चपासून प्रशासकाच्या ताब्यात आला आहे. नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत  सर्व कारभार प्रशासक चहल यांच्याकरवी  चालविला जाणार आहे.

Municipal Administrator in eqbal singh Chahal Action Mode; Pre-Monsoon Review Meeting: Complete the work before 15th May | पालिका प्रशासक चहल ॲक्शन मोडमध्ये; मान्सूनपूर्व आढावा बैठक : कामे १५ मे पूर्वी पूर्ण करा

पालिका प्रशासक चहल ॲक्शन मोडमध्ये; मान्सूनपूर्व आढावा बैठक : कामे १५ मे पूर्वी पूर्ण करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर प्रशासक  डॉ. इक्बाल सिंह चहल  पहिल्या दिवसापासून ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. 

मंगळवारी त्यांनी सर्व विभागप्रमुख, अधिकाऱ्यांसह महानगरातील विविध प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन मान्सूनपूर्व पूर्ण कामाच्या तयारीचा आढावा घेतला. शहर व उपनगरात  सुरू असलेली मेट्रो, मोनो म्हाडा व एमएमआरडीएकडून सुरू असलेली रस्त्यावरील कामे १५ मे पूर्वी पूर्ण करावीत. त्यानंतर रस्त्यावर राडारोडा (डेब्रिज) न हटविल्यास संबंधिताविरुद्ध  पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई महापालिकेचा कारभार ८ मार्चपासून प्रशासकाच्या ताब्यात आला आहे. नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत  सर्व कारभार प्रशासक चहल यांच्याकरवी  चालविला जाणार आहे. त्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह महानगरपालिका क्षेत्रातील ज्या-ज्या यंत्रणेद्वारे विविध स्तरीय कार्यवाही केली जाते; त्या सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे कामांची पाहणी करावी, सर्व संबंधित कामे वेळच्या वेळी पूर्ण करावीत आणि इतर यंत्रणांसोबत सुसमन्वय साधावा, असे निर्देश दिले. या बैठकीला ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डाॅ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अन्यथा पोलीस तक्रार करा
विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे उपयोगितांसाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. त्याठिकाणचा राडारोडा वेळच्यावेळी न हटविल्यास तो पावसामुळे वाहून त्या  ठिकाणी पाणी तुंबू शकते. त्यामुळे  वेळच्यावेळी राडारोडा न हटविणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची सूचना सर्व संबंधित सहआयुक्त व उपायुक्तांना  दिली. पावसाळापूर्व विविध कामे ही निर्धारित वेळेत करा, असे सांगून ते म्हणाले, पावसाच्या पाण्याचा निचरा संथगतीने होणाऱ्या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.

Web Title: Municipal Administrator in eqbal singh Chahal Action Mode; Pre-Monsoon Review Meeting: Complete the work before 15th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.