नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:17 PM2021-11-15T21:17:19+5:302021-11-15T21:18:12+5:30
गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून आलेली नाही. मात्र नववर्षाच्या जल्लोषासाठी परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची सांख्य अधिक असते. त्यामुळे गाफील राहिल्यास अन्य देशातील विषाणूचा संसर्ग मुंबईत शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच फेब्रुवारी- मार्च महिन्यात तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. सध्या दररोजची रुग्ण संख्या दोनशे - अडीशे असून दोन हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०३ टक्के एवढा आहे. कोविड मृत्यूचे प्रमाणही एक टक्क्यांहून कमी आहे. गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांची संख्या वाढेल, असे अंदाज व्यक्त होत होते. मात्र लसीकरणाच्या प्रभावामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याचे आढळून आले आहे. दिवाळीमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. या काळात लोकांच्या भेटीगाठीही वाढल्या. परंतु, अद्याप रुग्ण संख्येत सुदैवाने वाढ दिसून आलेली नाही.
दिवाळीतील भेटीगाठींच्या परिणामकडे लक्ष
मागील वर्षी कोरोना काळात दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने दिवाळीत मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सण साजरा करण्यात आला. त्यानंतरचा १४ दिवसांचा कालावधी २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. तोपर्यंत रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती कायम आहे.
नववर्षाचा जल्लोष पडू शकतो महागात
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असला तरी अद्याप या विषाणूचा धोका टळलेला नाही. पुढच्या महिन्यात नाताळ व त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठ्या पार्ट्या, जल्लोष मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. परदेशातून येणारे पर्यटक, नातलग, पाहुणे यांची संख्या अधिक असू शकते. अन्य देशांमध्ये कोरोनाचा प्रसार सुरु आहे. त्यामुळे नववर्षाच्या जल्लोषाची गर्दी कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकते. यामुळे महापालिकेमार्फत विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यानुसार विमानतळावर तपासणी, परदेशी पाहुण्यांची नोंद ठेवणे आदींचा समावेश असेल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आतापर्यंत बाधित रुग्ण – ७५९७७७
कोरोना मुक्त - ९७ टक्के
मृत्यू – १६२९६
सक्रिय रुग्ण – २७७५
रुग्ण वाढीचा दैंनदिन सरासरी दर ०.०३ टक्के
१८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५००
पहिला डोस घेणारे - ९२ लाख ३९ हजार ९०२(काही मुंबईबाहेरील नागरिकांचा समावेश)
दुसरा डोस घेणारे - ५९ लाख ८३ हजार ४५२