Join us

प्रतिबंधित प्लास्टिक जमा न करणाऱ्यांना तुरूंगवास,महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:41 AM

प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना मुंबईत अनेक ठिकाणी फेरिवाले, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.

मुंबई : प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना मुंबईत अनेक ठिकाणी फेरिवाले, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिक जवळच्या विभाग कार्यालयातील संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा पाच ते २५ हजारापर्यंतच्या दंडाससह तुरुंगवासाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.२३ जून २०१८ पासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने सर्व २४ विभागांतील व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सुरू आहे. त्यामुळे कारवाई तीव्र करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.मुंबईभरात पालिकेच्या ३१० निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या टीमकडून प्लास्टिकबंदीविरोधात कारवाई सुरू आहे. मार्केट, परवाना विभाग आणि आस्थापना विभागातून या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.यावर बंदी... : प्लास्टिक व थर्माकॉलपासून तयार करण्यात येणाºया प्लास्टिक पिशव्या (हॅन्डल असलेल्या व नसलेल्या), डिस्पोजेबल वस्तू (उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाट्या, चमचे इत्यादी) हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाºया प्लास्टिक वस्तू, द्रवपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिक वस्तू, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री आयात व वाहतूक करण्यास राज्यात संपूर्ण बंदी करण्यात आलेली आहे.कारवाईचे स्वरूप... : उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांच्याकडे राज्य शासनाने अधिसुचनेनुसार प्रतिबंधित केलेले प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम १२ अन्वये तडजोडीने प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसºया गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येईल.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीमुंबईमुंबई महानगरपालिका