लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत आता शाळांसह, मंदिरे आणि सिने-नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्यामुळे अधिक निर्बंध शिथिलतेमुळे पुन्हा संसर्ग वाढीचा धोका संभावू शकतो, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सावध पवित्रा घेतला असून, सेवा- सुविधा, लसीकरणाला गती आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे कार्यवाही व नियोजन करण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यामध्ये खाटांची उपलब्धतता वाढविणे. कोविड उपचार केंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविणे. रुग्णालये अधिक सुसज्ज करावीत. कोविड चाचण्यांची संख्या वाढविणे. प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे, यांचा समावेश आहे. महानगरपालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रे इत्यादी ठिकाणी असलेल्या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असलेल्या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छताविषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबतदेखील आढावा घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या तीन नियमांचे पालन नागरिकांनी अधिकाधिक प्रभावीपणे करावे, यासाठी जनजागृतीपर कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासह दंडात्मक कारवाईदेखील अधिक काटेकोरपणे करण्यात येत आहे. या तीन नियमांमध्ये सार्वजनिक ठिकाण मुखपट्टी वापरणे. २ व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे. वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली
सहवासितांचा शोध, वारॅ रूम सज्ज
कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविडबाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत. कोविडविषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी व अधिक सुयोग्य प्रकारे करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या नियंत्रण कक्षांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण कक्षांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.