Join us

स्वराज्यभूमी येथील टिळक स्मारकाच्या डिझाईनला पालिकेची मंजूरी

By मनोहर कुंभेजकर | Published: February 04, 2024 11:14 AM

येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहांच्या सोई सुविधा दिल्या जाणार आहेत.

मुंबई-गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या स्वराज्यभूमी स्मारकाच्या आराखड्याला अखेर पालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे.स्मारकाजवळ झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली आहे. या बैठकीला महानगरपालिकेच्या परिमंडळ १ च्या उपायुक्त डाॅ.संगिता हसनाळे, सहाय्यक अभियंता मनोज जेऊरकर, रावसाहेब सांगोलकर व स्मारक समितीतर्फे प्रकाश सिलम, डी.एम. उपासनी , गिरीश कुलकर्णी हे उपस्थित होते.

महानगरपालिकेचा ड विभाग व लोकमान्य टिळक स्वराज्यभूमीचे विश्वविख्यात वास्तुविशारद डी.एम.उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकृती साकारणार आहे. यानंतर ध्वजस्तंभ, प्रवेशद्वारावरील भव्य स्वराज्यभूमी कमान, भूमिगत चित्रशिल्प, नाना नानी पार्क, बालोद्यान, नारळी बन, बिर्ला ( स्वराज्य भवन ) क्रिडा केंद्र, भेळ प्लाझा , प्रबोधन कट्टे व अन्य उपक्रम येथे राबवले जाणार आहेत. 

येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहांच्या सोई सुविधा दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे गणेश विसर्जसाठी खोल पाण्यापर्यंत जेट्टीही बांधली जाणार आहे. उत्तम कलाकृतीसाठी अनेक कलावंत या उपक्रमात सहभागी होणार आहेत. चार टप्प्यांमधे हे कार्य पूर्ण होईल नंतर सदर प्रकल्पाचे राष्ट्रार्पण होईल. लोकमान्य टिळक स्वराज्यभुमी स्मारक समितीतर्फे सदर उपक्रम साकारले जाणार असून संकल्पना प्रकाश सिलम यांची आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका