Join us

कोरोना लसीकरणासाठी पालिकेची फौज तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:07 AM

७६२ मास्टर ट्रेनर : २५०० कर्मचारी प्रशिक्षितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना लसीवरील संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने मुंबई ...

७६२ मास्टर ट्रेनर : २५०० कर्मचारी प्रशिक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना लसीवरील संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने मुंबई महापालिकेनेही आता लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या १४ दिवसांत ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. या प्रशिक्षकांनी आणखी अडीच हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. पाच टप्प्यांमध्ये ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे.

कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आता अंतिम टप्प्यात असून, केंद्र सरकारने लस पुरविल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी महापालिकेने १८ डिसेंबरपासून जी - उत्तर विभागात धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले असून, प्रत्येक विभागात हे प्रशिक्षण देण्यात आले. ते शुक्रवारी पूर्ण करण्यात आले.

गेल्या १४ दिवसांच्या प्रशिक्षणातील पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करावे? कोणती काळजी घ्यावी? तसेच ओळख कशी पटवावी? याची माहिती डॉक्टर्स, आरोग्यसेवकांना, पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘कोविन अ‍ॅप’मध्ये व्यक्तीची माहिती कशी भरावी? आणि त्याचा कसा वापर करावा? याची माहिती देण्यात आली. प्रत्येकी एक दिवसाचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. लसीकरणासाठी मुंबईतील आठ रुग्णालयांची निवड करण्यात आली.

* कोल्डस्टोरेज १० जानेवारीपर्यंत तयार

मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या लसींचा साठा कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजमध्ये केला जाईल. यासाठी पाच हजार चौरस फुटांच्या संपूर्ण एका मजल्यावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. या कोल्ड स्टोरेजचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. एकाचवेळी सुमारे १५ लाख लसींचा साठा या कोल्ड स्टोरेजमध्ये करता येईल.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त )

.......................