पालिका अधिकारीच करतात कचऱ्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:43 AM2018-05-16T02:43:53+5:302018-05-16T02:43:53+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण होत असल्याने मुंबईकरांना मोबाइलवर स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते.
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण होत असल्याने मुंबईकरांना मोबाइलवर स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, या अॅपला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचाºयांना भाग पाडून त्यांच्याकडूनच कचºयाविषयीच्या तक्रारी घेण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
स्वच्छता अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजना अंमलबजावणी संस्था स्थापन करणे व स्वच्छ सर्वेक्षण २०१८साठी मत नोंदविण्याचे आवाहन करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचे तीन प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केले होते. या कामांसाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, यावर आक्षेप घेत हे काम नेमके कोणत्या स्वरूपाचे आहे? यावर नगरसेवकांनी खुलासा मागविला. तर स्वच्छता अॅप मोबाइलमध्ये घेऊन त्याच्या माध्यमातून मुंबईमधील कचºयाविषयीच्या तक्रारी करण्याचे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले होते. मात्र, मुंबईकरांनी हे अॅप आपल्या मोबाइललामध्ये डाऊनलोड केलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी अन्य कर्मचारी व अधिकाºयांना हे अॅप त्यांच्या मोबाइलवर डाऊनलोड करण्यास भाग पाडले. कर्मचारीच कचºयाविषयीच्या तक्रारी अॅपवर टाकत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी या बैठकीत केला.
>कर्मचारीही नागरिकच
मुंबईत जनजागृतीनंतरही केवळ चार लाख ९३ हजार ९६ मुंबईकरांनी आपल्या मोबाइलमध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोड करून घेतले आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छता अॅपवर आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात येते. तसेच पालिका कर्मचारी आणि अधिकारी हेदेखील नागरिकच आहेत, असा बचाव पालिका प्रशासनाने केला. नागरिक या नात्याने त्यांनी हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये घेतले आहे. त्यांच्याही तक्रारींची दखल घेतली जाते, असे स्पष्टीकरण घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाºयांनी दिले.