Join us

म्युनिसिपल बँक घोटाळ्याचा तपास थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 5:12 AM

निकमने बँक व्यवस्थापकाच्या पासवर्ड, आयडीचा वापर करत, ३ कोटी ४९ लाख ६६ हजार रुपयांचा घोटाळा केला.

मुंबई : महानगरपालिकेच्या दि म्युनिसिपल को.आॅप. बँकेच्या मुलुंड शाखेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद रमेश निकम हा न्यायालयीन कोठडीत आहे, तसेच या प्रकरणातील संशयित अजूनही मोकाट असून, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर खातेदारांकडून येत आहे, तर दुसरीकडे बँक घोटाळ्याच्या मुद्द्यावरूनच बँक निवडणुकांचा छुपा प्रचार रंगताना दिसत आहे.

निकमने बँक व्यवस्थापकाच्या पासवर्ड, आयडीचा वापर करत, ३ कोटी ४९ लाख ६६ हजार रुपयांचा घोटाळा केला. याच दरम्यान त्याने विविध बनावट खाती तयार करत त्यात पैसे वळते केले. याच दरम्यान आणखीन दोघांची नावे समोर आली. त्यातही, निकम माहिती लपवत असल्याचा संशयही खातेदारांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी सखोल तपास करत, याच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे खातेदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बँकेच्या निवडणुकांसाठी विविध पॅनलचा प्रचार सुरू झाला आहे. यात, काही जण हाच घोटाळ्याचा मुद्दा उचलून प्रचार करताना दिसत आहेत. त्यातही, खातेदारांकडून बँकेतील भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींवर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. भविष्यात असे होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करणाºयाच पॅनलला सहकार्य करण्याचा पवित्रा काही कामगारांनी घेतला आहे.