डासांचे अड्डे शोधण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:30 AM2018-06-02T04:30:37+5:302018-06-02T04:30:37+5:30
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने महापालिकेने प्रतिबंधक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शु्क्रवारपासून कीटकनाशक विभागामार्फत मुंबईभर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे
मुंबई : पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने महापालिकेने प्रतिबंधक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शु्क्रवारपासून कीटकनाशक विभागामार्फत मुंबईभर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत पाण्याच्या टाक्या, घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पाणी साठण्याची ठिकाणे हुडकून काढण्यात येत आहेत.
पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्व सरकारी-निमशासकीय आस्थापनांमध्ये डेंग्यू-मलेरिया डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे हुडकून काढण्यात येत आहेत. शुक्रवारपासून कीटकनाशक विभागामार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली. या अंतर्गत ३६० कामगारांनी झोपडपट्टींमध्ये टाकण्यात आलेले प्लॅस्टिक, टायर काढून टाकले.
दंडाची तरतूद
सरकारी किंवा निम शासकीय कार्यालय वा घरांत डास उत्पत्तीची ठिकाणे आढळल्यास पालिका अधिनियम १८८८ कलम ३८१ अन्वये कारवाई करेल. हा दंड दोन ते दहा हजारांपर्यंत असेल. त्यानंतरही संबंधितांकडे डासांची उत्पत्ती आढळली तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहणी...
कीटकनाशक विभागाने सांताक्रुझ (प.), खारदांडा, लोअर परळ - वादाची चाळ, ग्रँटरोड तुळशीवाडी, गोवंडी गौतम नगर, जे.जे. रुग्णालय कम्पाउंड, बोरीवली पूर्व देवीपाडा, काजूपाडा, बोरीवली प. शिंपोली रोड, शिवाजी नगर येथे सर्वेक्षण सुरू केले. रहिवाशांना पत्रकांच्या माध्यमातून पाणी साचू देऊ नये, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि स्वच्छतेबाबत माहिती देण्यात येत आहे.