मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणणारे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्समार्फत “आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०” पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दूतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून आयुक्त चहल यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार संवर्गासाठी ७६ जणांची नावे विचाराधीन होती. निकषांच्या आधारे ४१ जणांची नावे नामांकनासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र तज्ज्ञ व्यक्तींच्या परीक्षक मंडळाने एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस् - इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांची पुरस्कारासाठी निवड केली.
या ऑनलाइन सोहळ्यात अमेरिकेचे मुंबईतील राजदूत डेव्हिड जे. रांज, इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, भारतासह अमेरिकेतूनही विविध मान्यवर, तज्ज्ञ, पुरस्कार विजेते जोडले गेले होते. भारतात तसेच अमेरिकेत कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती, संस्था यांना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवउद्योजक, कॉर्पोरेटस्, लघूउद्योग, बिगर शासकीय संस्था, प्रशासन अशा विविध संवर्गामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
म्हणूनच आयुक्तांची पुरस्कारासाठी निवड...
कोरोनाला पळवून लावण्यासाठी 'चेस द व्हायरस' ही आयुक्त चहल यांची मोहीम प्रभावी ठरली. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि क्वारंटाइन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्यक्ष काम केले. मुंबईतील सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने व नर्सिंग होम, स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली. मुंबईत झालेल्या कामगिरीचे केंद्र सरकारसह जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात अथक परिश्रम करून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न तर इतर देशांनीही धारावी मॉडेल म्हणून स्वीकारले.
हा पुरस्कार स्वीकारणे ही गौरवाची बाब आहे. कोविड काळामध्ये करण्यात आलेली कामगिरी ही देशाची सेवा तर आहेच, सोबत मानवतेचीदेखील सेवा आहे. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स तसेच परीक्षकांचा मी आभारी आहे.- इक्बाल सिंह चहल (मुंबई महापालिका आयुक्त)