Join us  

पालिका आयुक्त चहल यांचा पद्मश्रीसाठीचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 8:46 AM

सरकारी नियमाचे दिले कारण; मारुती चितमपल्ली यांनाही फटका

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांनी गौरविले जाते. कोरोना काळात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी पद्म पुरस्कारासाठी स्वत:च अर्ज केला होता. मात्र केंद्र सरकारच्या नियमांनुसार सरकारी सेवेत कार्यरत किंवा सेवेतून निवृत्त झालेल्यांची शिफारस करता येणार नाही, त्यामुळे या राज्य सरकारने त्यांची शिफारस फेटाळली आहे. विशेष म्हणजे, याचा फटका अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांनाही बसला आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापनात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. मुंबईसारख्या शहरात लाखो कोरोना रुग्ण असतानाही रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने नियोजन केले होते. या मॉडेलचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक करण्यात आले. कोरोनाकाळात करण्यात आलेली जनजागृती तसेच महापालिकेचा आयुक्त म्हणून केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळावा, असा अर्ज चहल यांनी केला होता. मात्र, सरकारी अधिकारी असल्याने राज्य सरकारने त्यांचे प्रकरण केंद्राकडे पाठविण्यास नकार दिला. याआधी २०२२ मध्ये वेळेत अर्ज आला नाही, असे कारण देत राज्य सरकारने चहल यांच्या अर्जावर विचार केला नव्हता.

निसर्ग आणि पक्षी संवर्धनात महत्त्वाची कामगिरी बजावणारे अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी २०२३ मध्ये बहार नेचर फाउंडेशनने (वर्धा) शिफारस केली होती. याआधीही अनेकदा त्यांच्या नावाची शिफारस झाली, मात्र केवळ निवृत्त सरकारी अधिकारी असल्याने त्यांना पुरस्कार नाकारण्यात आला आहे.

सरकारच्या नियमांनुसारच यादी

पॉवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी बजावणारे सेवानिवृत्त अधिकारी सतीश पाताडे, निवृत्त सैन्य दल अधिकारी आकाराम शिंदे यांना मॅरेथॉन, ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत, त्याचप्रमाणे कवी सुरेश धुळे, लेखक रामचंद्र जंगले, भरतनाट्यम नृत्य कलाकार शतावरी वैद्य यांना केवळ सरकारी सेवेत असल्याने किंवा निवृत्त झाल्याने पुरस्कार नाकारण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या नियमांनुसारच यादी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

सरकारी शिफारशींपैकी तिघांनाच पुरस्कार

यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांसाठी ४५ जणांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात देण्यात आलेल्या ९ पद्म पुरस्कारांपैकी राज्य सरकारच्या यादीतील भिकू रामजी इदाते, डॉ. परशुराम खुणे, रविना टंडन यांनाच सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :मुंबई