Join us  

पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा !

By admin | Published: December 06, 2015 2:43 AM

नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल स्थायी समिती आणि सभागृहापुढे आला नाही.

मुंबई : नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल स्थायी समिती आणि सभागृहापुढे आला नाही. मात्र प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाला. यावर संतप्त झालेले स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी अजय मेहता यांच्यावर आगपाखड करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यशोधर फणसे यांनी यासंबंधीची मागणी केली आहे. आयुक्तांनी हाताखालील अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. अन्यथा आयुक्तांना परत पाठविण्यासाठी आम्हाला पुढील पावले उचलावी लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. नालेसफाईच्या मुद्द्यावरून स्थायी समितीसह सभागृहात भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. यावर आयुक्तांनी चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीने कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवाय कंत्राटदारांना दोषी ठरविले होते. यात पालिका अधिकारीही सामील असल्याचा ठपका समितीने ठेवला होता. समितीने आपला अहवाल तयार करत तो आयुक्तांकडे सादर केला असतानाच तो स्थायी समिती किंवा सभागृहात येणे गरजेचे होते. परंतु त्याआधीच अहवालाबाबतचे वृत्त प्रसारित झाले. परिणामी स्थायी समितीच्या अधिकारांना आयुक्त जुमानत नाहीत, असा आरोप फणसे यांनी केला आहे. शिवाय आयुक्त आमचे ऐकूनही घेत नाहीत, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांच्या कार्यालयात सादर झालेला अहवाल तेथूनच फुटला. परिणामी यासंबंधीच्या चौकशीची मागणी करणारे पत्रही आयुक्तांना देण्यात आले आहे. आणि अहवाल फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.