‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे’ अशा आशयाच्या बॅनरवर महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:49 AM2019-11-01T01:49:36+5:302019-11-01T01:49:58+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच आणि निकालानंतरही शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ या बंगल्याबाहेर लावण्यात आलेले ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीआदित्य ठाकरे’ अशा आशयाच्या बॅनरवर महापालिकेने गुरुवारी कारवाई करीत हे बॅनर खाली उतरविले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापन करण्याकरिता आवश्यक असलेला १४५ हा आकडा कोणत्याच राजकीय पक्षाला गाठता आला नसला तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाहून शिवसेनेने भाजपला घेरले असताना आणि राज्यभरात मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा असतानाच गुरुवारी ही कारवाई मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच आणि निकालानंतरही शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. महत्त्वाचे म्हणजे विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून बहुमताने विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी वर्गाने आदित्य ठाकरे यांचे विजयाबाबत अभिनंदन करतानाच ‘मातोश्री’बाहेर ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर लावले होते. मात्र मुंबई महापालिकेने ते अनधिकृत ठरवत लावण्यात आलेल्या या बॅनरवर गुरुवारी कारवाई करत हे सर्व बॅनर उतरवले.