अवयव दानासाठी महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन, 'डोनर कार्ड' सोशल मीडियावर करा 'अपलोड'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:59 PM2021-11-26T19:59:13+5:302021-11-26T19:59:59+5:30
National Organ Donation Day: राष्ट्रीय अवयव दानाच्या मुहूर्तावर अवयव दानासाठी नोंदणी करून डोनर कार्ड सोशल मीडियावर अपलोड करण्याचे पालिका प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे.
मुंबई - मृत्यु हे आपल्या आयुष्यातील चिरंतन सत्य आहे, जे कधीही बदलता येऊ शकत नाही. मात्र या जगातून जाता-जाता आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करु शकतो. यंदा राष्ट्रीय अवयव दानाच्या मुहूर्तावर अवयव दानासाठी नोंदणी करून डोनर कार्ड सोशल मीडियावर अपलोड करण्याचे पालिका प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे.
२७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान दिनानिमित्त महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव-दान नोंदणी करण्याचे साकडे पालिकेने घातले आहे. अवयव-दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना आवर्जून सांगावी, असे आवाहन पालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता व ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
राज्यात २० हजार दात्यांची नोंदणी...
राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. सन २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड, ४८० व्यक्तिंना यकृत, १३० व्यक्तिंना हृदय, ४३ व्यक्तिंना फुप्फुसे, सहा व्यक्तिंना स्वादुपिंड, तीन व्यक्तिंना आतडे तर चार हात दान करण्यात आले आहेत. ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे एक हजार ४७५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आल्याची माहिती ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिली.
अवयवदान यशस्वी...
आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे सन २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड, १८५ व्यक्तिंना यकृत, ६७ व्यक्तिंना हृदय, २६ व्यक्तिंना फुप्फुसे, सहा व्यक्तिंना स्वादुपिंड, एका व्यक्तिला आतडे आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत.
अशी आहे प्रतीक्षा यादी...
अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर सहा हजार ७४८ गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने पाच हजार ३७४ मूत्रपिंड, १,१९४ यकृत, १०१ हृदय, २१ फुफ्फुसे, ५३ स्वादुपिंड व पाच आतडे यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे.