Join us  

निवडणुकीमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प लटकणार

By admin | Published: February 02, 2017 3:26 AM

अर्थसंकल्प म्हणजे मतदारांवर प्रभाव पाडण्याचे एक प्रभावी माध्यम. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घोषणाबाजीच्या या संधीला सत्ताधारी मुकणार आहेत.

मुंबई : अर्थसंकल्प म्हणजे मतदारांवर प्रभाव पाडण्याचे एक प्रभावी माध्यम. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घोषणाबाजीच्या या संधीला सत्ताधारी मुकणार आहेत. विशेषत: भाजपाशी फारकत घेतल्यानंतर, अर्थसंकल्पातून मोठमोठ्या घोषणाबाजीने प्रचाराचे निम्मे काम सोपे केले असते, परंतु दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारा पालिकेचा अर्थसंकल्प, आता आचारसहिंतेमुळे २० मार्च म्हणजे दीड महिने विलंबाने सादर होणार आहे.मुंबई महापालिकेचा सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणे अपेक्षित होता. महापालिका आयुक्तांमार्फत हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करण्यात येतो. यामध्ये त्या-त्या आर्थिक वर्षातील विकासकामे, नव्या योजना, कर आणि दरवाढ, तसेच इतर नागरी पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असतो, परंतु यंदा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे, हा अर्थसंकल्प निवडणूक निकालानंतर सादर केला जाणार आहे. या पूर्वीही निवडणुकीच्या काळातील अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीत सादर केले आहेत.परंतु तो जाहीर न करता, सहा महिन्यांकरता मिनी अर्थसंकल्प बनवण्यात आला होता. मात्र, या वेळेस अर्थसंकल्प २० मार्चपर्यंत मांडला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती महापालिकेच्या लेखापाल विभागाने दिली. त्यानुसार, सध्याच्या अर्थसंकल्पाला ३१ मार्चपर्यंत मंजुरी आहे. त्यामुळे नवीन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर, हा अर्थसंकल्प मांडला जाईल. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर, तो अंमलात आणण्याची तरतूद आहे. त्यामुळे २० मार्चपर्यंत सादर करून, ३१ मार्चपूर्वी त्याला मंजुरी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)