मुंबई - मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र, कंगणा रानौतचे बांधकाम अनधिकृत होते तर एक महिन्यांपूर्वी, एक वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने का कारवाई केली नाही? असा सवाल करत पालिका आणि राज्य सरकारने आजची केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे, असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर कंगनाच्या घराबाहेर एकत्र येत तिच्या चाहत्यांनीही बीएमसी आणि शिवेसेनेवर टीका केली.
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनानं १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.
कंगना आज मुंबईत दाखल झाली आहे. तत्पूर्वीच सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. त्यावेळी, कंगानाच्या काही चाहत्यांनी तिच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. या चाहत्यांनी कंगनाच्या कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईला विरोध केला. तसेच, बीएमसी खड्डे बुजवू शकत नाही, पण घर तोडू शकते, असे म्हणत एका चाहत्याने आपला रोष व्यक्त केला. शिवसेनेची दादागिरी चालणार नाही, मुंबई कुणाच्या बापाची नाही. येथे सर्वच राज्यातील लोकं राहतात, विविध लोकं एकत्र नांदतात. त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागावी, असेही या चाहत्यांना म्हटले.
कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर भाजपा नेते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करताना, ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचे म्हटले. त्यानंतर, महिला कुस्तीपटू गीता फोगाटनेही ट्विट करुन कंगनाचे समर्थन केले आहे. तसेच, शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीक केलीय. ''ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर कंगना राणावत का ऑफ़िस तोड सकते है हिम्मत नहीं'', असे ट्विट गीता फोगाटने केले आहे. तर, शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान देणं शिकवलं, पण हे लांडग्यासारखे कंगनाच्या मागे लागलेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जबर प्रहार केला.
शेलार यांचे प्रश्न ?
आमच्या बरोबर याल तर वाचवू आणि आमच्या विरोधात गेलात तर घरात घुसून ठोकून काढू, असे ठोकशाहीचे वर्तन राज्यातील ठाकरे सरकारचे आहे. हे आज दिसून आले, असे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "बात हरामखोरीची निघाली तर मग 'डांबराने' लिहिले जाईल, असे मुंबईकरांना बरेच आठवेल. 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबई मातेचा अपमान कोण करतंय? बेईमानी नेमकी कोण करतंय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पाहा!", असे प्रश्नही शेलार यांनी विचारले आहेत.