मुंबईत आजपासून पुन्हा प्लास्टीकवर कारवाई, महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:46 AM2020-03-01T01:46:32+5:302020-03-01T01:46:35+5:30
दोन वर्षांपूर्वी प्रतिबंधित प्लास्टीकवर सुरू केलेली कारवाई थंडावल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा प्लास्टीक वस्तूंचा वापर सर्रास होऊ लागला आहे.
मुंबई : दोन वर्षांपूर्वी प्रतिबंधित प्लास्टीकवर सुरू केलेली कारवाई थंडावल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा प्लास्टीक वस्तूंचा वापर सर्रास होऊ लागला आहे. यामुळे महापालिका रविवार, १ मार्चपासून प्लास्टीकवर पुन्हा कारवाई सुरू करीत आहे. मात्र, यावेळीस मे, २०२० मुंबई प्लास्टीकमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, पालिकेचे विशेष पथक दुकान, लग्नाचे हॉल, उपहारगृहात झाडाझडती घेणार आहेत. प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर पहिल्यांदा पाच हजार रुपये, दुसºया वेळेस १० हजार रुपये, तर तिसºया खेपेला २५ हजार रुपयांचा दंड व तीन महिन्यांची कैद होऊ शकते.
महापालिकेने २३ जून, २०१८ मध्ये प्रतिबंधित प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल व प्लास्टीकच्या वस्तूंवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, ही कारवाई सहा महिन्यांतच थंडावल्यामुळे बाजारपेठ, दुकानांमध्ये प्लास्टीकचा वापर सुरू झाला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मे, २०२० पर्यंत संपूर्ण राज्यातून प्रतिबंधित प्लास्टीक हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, प्लास्टीकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणुकीवर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्लास्टीकच्या पिशव्या, ताट, कप, प्लेट्स, ग्लास, चमचे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅक करताना वापरल्या जाणाºया प्लास्टीकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातलेली आहे.
या कारवाईसाठी २४ विभाग कार्यालयांत अनुज्ञापन, आरोग्य, बाजार, दुकाने व आस्थापना, शिक्षण या विभाग अधिकाऱ्यांचे पथक करण्यात आले आहे. हे पथक आपल्या विभागाच्या कार्यक्षेत्रातील आस्थापना, कार्यालये, मॉल येथे धाड टाकून कारवाई करणार आहेत, तसेच पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्लास्टीक न वापरण्याची शपथ देणे, विद्यार्थ्यांच्या घरातील प्लास्टीक पालिका शाळेत आणून जमा करणे, प्लास्टीकबंदीसाठी स्पर्धा आयोजित करणे, तसेच सर्व शाळांमधून प्रतिबंधित प्लास्टीक वापरत नसल्याबाबत हमीपत्र घेण्यात येणार आहे.
>प्लास्टीक
उचलण्याची मोहीम
पालिकेकडून कचºयाचे डबे पुरविणे, जमा प्लास्टीकची विल्हेवाट लावणे, आठवड्यातून एक दिवस विभाग कार्यालयात प्लास्टीक संकलित करण्याची व्यवस्था लावणे, जनजागृती करणे, विविध सेवाभावी संस्थांची मदत घेणे, सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेले प्लास्टीक त्वरित उचलणे, हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
>प्लास्टीकवरील कारवाई
(२३ जून, २०१८ पासून आतापर्यंत)
१६,00,३२४
आस्थापनांची तपासणी
८५,८४०
किलोग्रॅम प्रतिबंधित
प्लास्टीक जप्त
४,६४,३०,000
रुपयांचा दंड वसूल
>या कारवाईसाठी स्थापन केलेल्या ब्ल्यू स्क्वॉडमध्ये बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यातील ३१० निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.