लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी दक्षिण मुंबईच्या किनारी भागात सागरी किनारा मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गावरील एका जोडपुलाच्या आड येत असलेली १७ गिरणी कामगारांची घरे महापालिकेकडून जमीनदोस्त केली जातील. या जोडपुलामुळे महालक्ष्मी येथे वसलेल्या मॉडर्न मिल कम्पाउंडमधील सातपैकी एक चाळ जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महालक्ष्मी येथील सात रस्त्यानजीक प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गास जोडण्यात येईल. हा पूल केशवराव खाड्ये मार्गावरून जाताे. येथेच मॉडर्न मिल कम्पाउंड येथील १७ कुटुंबीयांची चाळ पुलाच्या आड येते आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या चाळीला नोटीस दिली आहे. ब्रिटिश काळात मॉडर्न मिलमधील कामगारांना राहण्यासाठी बोमेनजी पपेटी यांनी महालक्ष्मी येथे ही घरे बांधली. १९०२ च्या सुमारास सहा चाळी उभारण्यात आल्या. येथील मिलमधील कामगारांची संख्या वाढत गेली. परिणामी, १९३० च्या सुमारास येथे दुमजली इमारत बांधण्यात आली. येथील कामगार वसाहतीमध्ये १५६ कामगारांची कुटुंबे राहत आहेत. मात्र आता सागरी किनारा प्रकल्पामुळे १७ कुटुंबे रस्त्यांवर येणार आहेत.
दरम्यान, येथील गिरणी कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करता यावा म्हणून मालकही प्रयत्नशील आहे. परंतु आता सागरी किनारा प्रकल्पाच्या कामात येथील एक चाळ जाणार असल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. आमच्या राहण्याची व्यवस्था याच परिसरात करावी, अशी त्यांची मागणी आहे.
* पुनर्वसनाची चिंता
मुंबई महापालिकेकडून संबंधितांना नोटीस बजावली आहे. पुनर्वसनाचे काय? याचे उत्तर प्रशासन देत नाही. कोरोना, लॉकडाऊन आता नोटिसीमुळे मानसिक ताण वाढत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील कुटुंबे पिढ्यांपिढ्या येथे राहत आहेत. त्यामुळे येथील कुटुंबे उद्ध्वस्त होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सरकारने लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
............................................