Join us

महापालिकेने नऊ विभागांतील केली मलेरिया, डेंग्यूची ८२९ उत्पत्तिस्थळे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 3:51 AM

कुलाबा ते दादर पालिकेची विशेष मोहीम : सहा हजार इमारतींची झाडाझडती

मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असताना मलेरिया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपनगरापेक्षा शहर भागातच रुग्ण अधिक असल्याने कुलाबा ते दादरपर्यंत असलेल्या नऊ विभागांमध्ये महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेत कीटकनाशक विभागामार्फत सहा हजार ५०८ इमारतींची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये सापडलेली एनोफिलीस डासांची ८२९ उत्पत्तिस्थळे नष्ट करण्यात आली. भायखळा, वरळी, लोअर परळ, प्रभादेवी या भागांमध्ये सर्वाधिक उत्पत्तिस्थळे आढळून आली.

पावसाळ्यात दरवर्षी मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी डासांची उत्पत्तिस्थळे शोधून ती नष्ट केली जातात. यावर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असल्याने अनेक पावसाळापूर्व कामे लांबणीवर पडली होती. मात्र या काळातही महापालिकेने डासांची उत्पत्तिस्थळे शोधून ती नष्ट करण्याची कार्यवाही केली. गेल्या काही दिवसांमध्ये मलेरियाचे तब्बल सहाशे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने ६ आॅगस्टपासून शहर विभागात मोहीम सुरू केली आहे.या ठिकाणी कारवाई...ए (कुलाबा, फोर्ट) ते जी उत्तर (धारावी, दादर, माहीम) या शहर भागातील नऊ विभागांतील ६५०८ इमारतींमध्ये कीटकनाशक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. या तपासणीमध्ये पाणी साचण्याची ठिकाणे असलेल्या तब्बल २०७७२ संभाव्य उत्पत्तिस्थळांमध्ये तपासणी करून ८२९ उत्पत्तिस्थळे आढळून आल्याने ती नष्ट करण्यात आली. जी दक्षिण विभागात २०३३२ उत्पत्तिस्थळांपैकी १५२ ठिकाणी, तर ई विभागात ४३२६ उत्पत्तिस्थळांपैकी १६३ ठिकाणी डासांचे अड्डे सापडले आहेत.आठ महिन्यांच्या काळातील कारवाई..१ जानेवारी ते २४ आॅगस्ट २०२० या सुमारे आठ महिन्यांच्या कालाधीत डेंग्यू प्रसार करणाºया ‘एडिस’ डासांची ७१ लाख ५१ हजार १८० संभाव्य उत्पत्तिस्थळे तपासण्यात आली. यापैकी ३५ हजार १५१ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली. तसेच मलेरिया प्रसार करणाºया एनोफिलीस डासांची दोन लाख ५७ हजार ९०९ संभाव्य उत्पत्तिस्थाने तपासण्यात आली. यापैकी आठ हजार ४५६ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली. पाणी साचू शकतील अशा तीन लाख २३ हजार ५७९ एवढ्या छोट्यामोठ्या वस्तू आणि ११ हजार १५३ टायर्स हटविण्यात आले आहेत.

टॅग्स :डेंग्यूमुंबई महानगरपालिका